बारसुचे कातळशिल्प राज्य संरक्षित यादीत समाविष्ट

 

राजापूर (वार्ताहर): शहरापासुन जवळच असलेल्या बारसु येथील कातळशिल्पाला अखेर राज्यशासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणुन घोषित केले असुन याबाबतची अधिसुचना ३० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिध्द केली आहे . बारसुचे हे समुह क्रमांक २ चे कातळशिल्प राज्य शासनाच्या संरक्षित यादीत समाविष्ट झाल्याने आता अन्य कातळशिल्पाना राज्य संरक्षित स्थळांचा दर्जा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

राज्यशासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अंतर्गत हे समुह क्रमांक २ चे कातळशिल्प संरक्षित केल्याची अधिसुचना जाहीर केली आहे. बारसु येथील शेतकरी भागोजी बाबाजी जांगळे यांच्या बारसु येथील सर्व्हे नं. २९/२/ब या जमिनीत ही कातळ शिल्प असुन सदरचे कातळ शिल्प हे मध्याश्मयुगीन आहे. या कातळशिल्प समुहात एक मनुष्याकृती चित्र असुन त्या माणसाचे दोन्ही हात वर असुन त्यामध्ये त्याने मासा पकडला आहे. त्याच्या डाव्या बाजुने दोन व उजव्या बाजुने तीन असे पाच मासे त्या मनुष्याकृतीच्या दिशेने येत आहेत. या माणसाचे पाय पाण्यात असुन त्याठिकाणी दोन मासे आहेत व त्याच समांतर रेषेत हवेत उडणारा बगळा दाखवला आहे. त्यामुळे कोकणातील प्रगैतिहासिक व विशेषत्वाने मद्याश्मयुगीन मानवाने निर्माण केलेली कलाकृती म्हणुन या कातळशिल्पाला अनन्यसाधारण महत्व आहे.

शासनाने प्रसिध्द केलेल्या अधिसुचनेनुसार या संरक्षित केलेल्या कातळशिल्पाचे (स्मारकाचे ) क्षेत्रफळ ०८.५० मिटर X ०३.५० मिटर म्हणजेच २९.७५ चौरस मिटर असुन त्या कातळशिल्प समुहाच्या चारही बाजुंपासुन १० मिटर म्हणजेच २२० चौरस मिटर चे क्षेत्र संरक्षित करण्यात येणार आहे . म्हणजे कातळ शिल्प धरुन संपुर्ण २४९.७५ चौरस मिटरचे क्षेत्र संरक्षित करण्यात येणार आहे.

राज्यसंरक्षित झालेल्या या कातळशिल्पाला विशेष महत्व असुन हे कातळशिल्प म्हणजे मानवाच्या कलेची सुरुवात झाल्याच्या काळ आहे. आजपर्यंत सापडलेल्या दोन हजार चित्रांपैकी सर्वात महत्वाचे असणारे हे कातळशिल्प समुह असल्याचे मत निसर्गयात्री संस्थेचे धनंजय मराठे यानी सांगितले.