रत्नागिरी : आपला आचार व विचार शुद्ध ठेवण्यासाठी प्रत्येकाने उपासना करणे आवश्यक आहे. घरामध्ये सामूहिक उपासनाही झाली पाहिजे. जेणेकरून घरात चांगला संवाद राहतो. संस्कृत स्तोत्रपठण, सूर्यनमस्कार, नामस्मरण करा. घरातील मोठ्यांना नमस्कार करा, हा संस्कार आहे. अन्न परमेश्वराला अर्पण करून प्रसाद म्हणून घ्यावे. आपला वेशही आपल्या संस्कृतीनुसारच असावा. अशा गोष्टींमुळे भगवंताचे अधिष्ठानही प्राप्त होते. या सर्व उपासनेमुळे आपण सक्षम होतो व सुखसंपत्ती प्राप्त होते, असे प्रतिपादन महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार विजेते वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी यांनी केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
कऱ्हाडे संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. व्यासपीठावर वेदमूर्ती मुरवणे यांच्यासह रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये व पुरस्कारप्राप्त व्यक्ती उपस्थित होत्या. या वेळी अध्यक्ष हिर्लेकर यांनी कोणतेही अर्ज मागवून पुरस्कार न देता कार्यकारिणी सदस्यांकडून येणाऱ्या माहितीच्या आधारे सत्कारमूर्ती निवडतो, असे सांगितले. संघाचा शतकमहोत्सवही जवळ आला आहे. संघाला अनेक दात्यांची मदत मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्कारमूर्तींनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विशेष आभार मानले. कामाची दखल घेऊन व अर्ज न मागवता संघाने दिलेला हा पुरस्कार लाखमोलाचा असल्याचे आवर्जून सांगितले. वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांनी या प्रसंगी सार्वकालीन ब्राह्मणाचा आचार आणि विचार या विषयावर सुरेख मार्गदर्शन केले. श्री. हिर्लेकर यांनी वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले. अतुल आंबेकर यांनी आभार मानले. संघाच्या कार्यकारिणी सदस्य, तसेच सचिव शिल्पा पळसुलेदेसाई, प्रीती टिकेकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
यांना दिला पुरस्कार
कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे धन्वंतरी पुरस्कार डॉ. मुरलीधर प्रभुदेसाई, उद्योगिनी पुरस्कार सौ. रश्मी प्रभुदेसाई, आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल जायदे, आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. कुमार भाट्ये, आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. विष्णू करंबेळकर आणि दर्पण पुरस्कार पत्रकार मयुरेश पाटणकर, राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार जलतरपणपटू निधी भिडे हिला देण्यात आला. उद्योजक पुरस्कार सौ. संपदा पुरोहित यांच्यावतीने त्यांच्या मुलग्याने पुरस्कार स्वीकारला










