अंगणवाड्यांत शिकवणार डीएड-बीएड, पदवीधर तरूण-तरूणी! संपातील सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना संप काळातील मिळणार नाही मानधन

सोलापूर : पेन्शन लागू करा, सेवेत कायम करा, मानधन नको दरमहा वेतन द्या, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अशा प्रमुख मागण्यांसाठी सोलापूरसह राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ३ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नसून आंदोलकही मागण्यांवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना ३ डिसेंबरपासून मानधन देऊ नका, असा फतवा एकात्मिक बालविकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे.

३ डिसेंबरपासून सर्वच अंगणवाड्यांवरील सेविका व मदतीनस संपावर असल्याने चिमुकल्यांना अंगणवाड्यांमध्ये जाता येत नाही. कुपोषणाचाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमधील बालकांना दररोज पोषण आहार देणे अत्यावश्यक आहे. परंतु, राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलनामुळे बालकांना पोषण आहारही मिळत नाही आणि त्यांना अंगणवाड्या बंद असल्याने त्याठिकाणी जाताही येत नाही अशी वस्तुस्थिती आहे. आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असल्याने आयुक्त रूबल अग्रवाल यांनी अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांसाठी पर्याय काढला असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागाची मदत घेतली जाणार आहे.

शाळेच्या वेळेत अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार

 

जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणाऱ्या किंवा जिल्हा परिषद शाळांजवळील अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना शाळेच्या वेळेत शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून आहार दिला जाणार आहे. दुसरीकडे झेडपी शाळांपासून दूर असलेल्या अंगणवाड्यांना बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहार देण्याचे नियाजन आहे, पण अद्याप त्यासंबंधीचा निर्णय झालेला नाही. तसेच संपावर तोडगा निघेपर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना शिकवावे लागणार आहे. त्याची जबाबदारी झेडपीच्या शाळांमधील पहिली- दुसरीच्या वर्गांवरील शिक्षकांवर सोपविली जाईल. पण, त्या शिक्षकांची भूमिका काय असणार, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन होईल, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

अध्यपनासाठी पदवीधर विद्यार्थ्यांची मदत

 

सेविका व मदतनीसांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील अंगणवाड्या मागील २२ दिवसांपासून बंद आहेत. चिमुकल्यांना ना पोषण आहार ना शिकवले जात आहे. जिल्हा परिषद शाळांजवळील अंगणवाड्यांचा प्रश्न सोडविला जात आहे, पण झेडपी शाळांपासून दूर असलेल्या गावातील किंवा वस्त्यांवरील अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना गावातील डीएड, बीएड किंवा पदवीधर तरूण- तरूणांची मदत घेतली जाणार आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी संप मिटेपर्यंत चिमुकल्यांना काही तास अध्यापन कराव, असे आवाहन केले जात आहे. पण, त्यांना कोणतेही मानधन व लिखित आदेश मिळणार नाहीत, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे..