सहा मित्रांचा जागीच मृत्यू
रांची : देशभरात नववर्षाचं (New year) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. कालच्या रात्रीही ठिकठिकाणी पार्ट्या करण्यात आल्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. मात्र, या आनंदाच्या वातावरणात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. न्यू इअर पार्टी करुन परतत असताना एका भीषण अपघातात (Accident) सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे ही पार्टी त्यांच्यासाठी अखेरची ठरली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
झारखंड (Jharkhand) येथील बिष्टुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्किट हाऊस भागात आज सकाळी हा अपघात झाला. वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पहिल्यांदा डिव्हायडला धडकली आणि नंतर एका झाडावर आदळून उलटली. या दुर्घटनेत कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला. धडक इतकी जबरदस्त होती की, याचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकू गेल्याने स्थानिकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीमधून आठजण प्रवास करत होते. त्यापैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघंजण बचावले आहेत. कारमध्ये बसलेले सर्व तरुण दारूच्या नशेत होते.
दरम्यान मृतदेहांना कारमधून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. सर्व मृत तरुण हे आरआयटी पोलीस स्टेशन हद्दीतील कुलुप्तांग येथील आहेत. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले, तसंच जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून हे तरूण कुठे पार्टी करण्यासाठी गेले होते याचा शोध घेतला जात आहे.