चिपळुणात गाळ साठा नियमावली शिथिल

 नदी, नाले पात्राशेजारील क्षेत्र वगळून कोठेही भराव करता येणार

 प्रशासन, बचाव समिती बैठकीत निर्णय

चिपळूण (प्रतिनिधी) : जलसंपदा विभागातर्फे शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाला सुरूवात झाली असून यासाठी ४ कोटी ८५ लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी फक्त गाळ उपशासाठीच्या पोकलॅन डिझेलवरच खर्च केला जाणार आहे. तसेच उपसलेल्या गाळाच्या साठ्याबाबतची नियमावली शिथिल करण्यात आली आहे. यामुळे शहरातील नदी, नाले पात्राशेजारील क्षेत्र वगळून उपसलेला गाळ कुणालाही कुठेही नेता येणार आहे. सोमवारी शहरातील प्रांत कार्यालयात आमदार शेखर निकम, बचाव समिती आणि प्रशासन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

शहरातील उक्ताडसह अन्यत्र पाटबंधारेकडून वाशिष्ठी नदीत गाळ उपसा सुरू झाला आहे. आता या गाळ उपशासाठी शासनाकडून मंजूर झालेला ४ कोटी ८५ लाखाचा निधी नुकताच पाटबंधारेकडे प्राप्त झाला आहे. या निधिचे नियोजन करण्याच्यादृष्टीने सोमवारी प्रांत कार्यालयात आमदार निकम, प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या उपस्थितीत तहसीलदार, प्रवीण लोकरे, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, विपूल खोत, यांत्रिकी विभागाचे काझी, बचाव समितीचे राजेश वाजे, बापू काणे, किशोर रेडीज, अरुण, महेंद्र कासेकर, उदय ओतारी तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आबू ठसाळे जयंद्रथ खताते, बाबू साळवी यांची बैठक झाली.

यावेळी झालेल्या चर्चेत जलसंपदा यांत्रिकी विभागाची यंत्रणा वापरून आलेला निधी केवळ गाळ उपशासाठीच्या पोकलॅन डिझेलवरच वापरला जाणार आहे. नगर परिषद शासकीय जागेवरील भराव हा नगर परिषदेने स्वखर्चाने वाहतूक करून करायचा आहे. त्यासाठी लागणाऱ्या डिझेलसाठी पालिकेने खर्च करावे. तसेच खासगी जागेत नागरिकांना गाळ हवा असल्यास तो मोफत मिळणार आहे. फक्त त्याचा साठा हा नदी, नाले पात्र शेजारील बांधकाम क्षेत्र वगळून कोठेही करता येणार आहे. त्यामुळे अशी क्षेत्र वगळून ज्यांना कुणाला उपसलेला गाळ आवश्यक आहे त्यांनी तो स्वतः वाहतूक खर्च करून न्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाशिष्ठी नदीमध्ये जुलै २०२१ निर्माण झालेल्या महापूर परिस्थितीमध्ये चिपळूण शहरामध्ये पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली होती. चिपळूण बचाव समिती व नागरिकांच्या लढ्यानंतर राज्य शासनाने वाशिष्ठी नदीतील गाळ व बेटे काढण्यासाठी सुमारे दहा कोटीचा निधी पहिल्या टप्यात उपलब्ध करुन दिलेला होता. वाशिष्ठी नदी टप्पा-१ मध्ये शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या निधी मधून सन २०२१ ते २०२३ मध्ये अंदाजे १२ लक्ष घ. मी. इतका गाळ काढला आहे. मात्र सद्यस्थितीत नदीपात्रामध्ये अजून मोठ्या प्रमाणात गाळ शिल्लक आहे. त्यासाठी ४ कोटी ८५ लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. सध्या चार पोकलॅनव्दारे गाळ उपसा सुरू आहे. आता प्राप्त झालेल्या या निधीमुळे लवकरच पोकलॅनची संख्या वाढवण्याचे या बैठकीत ठरले.