चिपळूण (प्रतिनिधी) : चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेचे हे ३५वे वर्ष असून ही स्पर्धा प्रतिवर्षीप्रमाणेच प्राथमिक आणि अंतिम अशा दुहेरी स्तरावर योजली जाणार आहे. महाराष्ट्रात सर्वदूर होणाऱ्या १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीतील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमधून केवळ प्रथम पारितोषिक विजेत्या एकांकिकाच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी होऊ शकतात.
सवाई एकांकिका स्पर्धेचे माहितीपत्रक, नियमावली, प्रवेशअर्ज इत्यादींसाठी उत्सुक संस्थांनी चतुरंग प्रतिष्ठानच्या Chaturang1974@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. स्पर्धेचे पूर्ण भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसहीत दि. ६ व ७ जानेवारी या दोन दिवसांतच सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत स्वीकारले जातील. स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. १३ व १४ जानेवारी रोजी योजली आहे. प्राथमिक फेरीतील परीक्षकांच्या निर्णयानुसार सात एकांकिकांची अंतिम फेरी गुरुवार दि. २५ जानेवारी रोजी रात्री ८.३० ते पहाटे ६ अशा ओव्हरनाईट कालावधीत कालिदास नाटयमंदिर, मुलुंड-पश्चिम येथे घेतली जाणार आहे.











