दोडामार्ग (प्रतिनिधी) : महाबळेश्वर येथील ग्राबीन फर्नांडीस यांच्या मोरगाव पवारवाडी येथील बंदावस्थेमधील फार्म हाऊसमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच परप्रांतियांना स्थानिक ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. एसीचा कॉम्प्रेसर व रेडिएटरसह लोखंडी सामान व इलेक्ट्रिक फॅन चोरी करण्याच्या उद्देशाने ते फार्म हाऊसमध्ये घुसले होते. हुसेन दुर्गाप्पा लाडलक्ष्मी (३१, रा. अडकूर, कोल्हापूर), सुरेश बाबू तुम्मानवर (३७, रा. दड्डी, बेळगाव), रामू दुर्गाप्पा लाडलक्ष्मीकार (४२, रा. शिरगाव, चंदगड), सुरेश सत्त्पा सिंगनुर (२८, रा. न्यू कांडरवल्ली, बेळगाव), श्याम बाबू तुम्मानवर (१९, रा. दड्डी, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.
दोडामार्ग पोलीस स्थानकात याबाबत मधुकर अर्जुन पवार (६५, रा. मोरगाव) यांनी फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, वरील पाचही संशयित सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ग्राबिन फर्नांडीस यांच्या बंद फार्महाऊस मध्ये घुसले होते. कॉल्ड्रमच्या आत प्रवेश करून त्यामध्ये असलेले एसीचा कॉम्प्रेसर व रेडिएटर चोरी करण्याच्या उद्देशाने बाहेर फेकले. तसेच लोखंडी सामान आणि इलेक्ट्रिक फॅन चोरी करीत असताना त्यांना स्थानिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. वरील पाचही संशयितांवर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर करीत आहेत.












