आंबोलीत महेंद्रा थार झाडावर धडकली ; एकाचा मृत्यू : सहा जखमी

गोवा येथे पर्यटनाला जाताना झाला अपघात

आंबोली । प्रतिनिधी : आंबोली नांगरतास येथे महेंद्रा थार कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात लातूर येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहाजण जखमी झाले. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आंबोली नांगरतास आराध्य हॉटेललगत ही दुर्घटना घडली.लातूर येरमळा -धाराशीव येथून गोवा येथे हे सर्वजण निघाले होते. मात्र, गाडी अतिजलद असल्याने चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही व गाडी रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की ते झाड उन्मळून पडले आणि गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.

या अपघातात दर्शनी भागात क्लीनर साईडला बसलेला युवक जागीच ठार झाला. दत्ता व्यंकट जाधव (३५ ) असे त्याचे नाव आहे. तर गाडीतील अन्य सहाजण जखमी झाले आहेत. त्यातीत दोघेजण गंभीर जखमी तर इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये महादेव भगवान बांगर (३२ रा. येरमळा जी. धाराशीव) गणेश दिलीप साळुंखे (२२, रा. जामखंडे ता. अहमदनगर ) बालाजी भगवान बांगर (४०, रा.येरमळ ता. कळंब जि धाराशीव), सुनिल कृष्णा कुलभैया (३१, रा. शिरोळ जि. बीड ), नवनाथ विठोबा जाधव (३९, रा. केज जि. बीड व विष्णू अंकूश बांगर (२२, रा येरमळा जि. धाराशिव यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगदीश दुधवाडकर, पोलिस नाईक मनिष शिंदे यांनी सुनिल नार्वेकर, मायकर डिसोजा, अजय नार्वेकर आणि इतर ग्रामस्थांच्या मदतीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्यांच्यावर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले.