बालिका दिनादिवशी पुरोगामीची शासनाकडे मागणी..
देवगड | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांचे नाव शाळेत दाखल करताना वडिलांच्या नावापूर्वी आईचे नाव लिहण्याचे निर्देश शासनाने लवकरात लवकर देवून सावित्रीच्या लेकींचा सन्मान महाराष्ट्र शासनाने करावा अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे बालिका दिनाचे औचित्य साधून शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवदनाच्या प्रति मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत. आज शासनाकडे मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात क्रांतीसुर्य जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानातून स्त्री शिक्षित झाली, आज पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे.
मात्र कोणत्याही व्यक्तीचे पूर्ण नाव लिहिताना आईचे नाव लिहिले जात नाही. याकडे पुरोगामी शिक्षक संघटनेने शासनाकडे वेळोवेळी मागणीही केलेली आहे. पण अद्याप निर्णय झालेला नाही. तेव्हा शासनाने सदरची संघटनात्मक मागणी लवकरात लवकर मान्य करून शालेय रजिस्टर मध्ये वडिलांचे नाव लिहण्यापूर्वी आईचे नाव लिहिण्याचे निर्देश द्यावेत. व यथावकाश सर्वच व्यक्तिंच्या आधार कार्डासह सर्वच नोंदीतही तशी दुरूस्ती करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. निवेदनावर संटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन जाधव व सरचिटणीस प्रकाश वाडकर यांनी दिली.











