खेड | प्रतिनिधी : तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती सुजाता नामदेव शेलार गेले महिनाभर ग्रामपंचायतीत येत नसून बेकायदेशीर गैरहजर आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज बंद तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतांना त्या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यामुळे अशा बेजबाबदार ग्रामसेविकेवर कारवाई करा अशी मागणी येथील माजी सरपंच व तालुका भाजपाचे पदाधिकारी उदय बोरकर यांनी केली आहे.
२३ डिसेंबर २०२३ पासून नळपाणी पुरवठा योजनेचा पंप विहीरीत पडून गावातील पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामसेवकाअभावी उपाययोजना करता आलेली नाही. ग्रामस्थांचे पाण्यावाचून खूप हाल झाले आहेत. नाईलाजाने ग्रामस्थांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागविले आहेत. या गोष्टी लेखी तक्रारीव्दारे कळवूनही तरीही वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष दिलेले नाही. गटविकास अधिकारी यांना कळवूनही ग्रामसेवक श्रीम. शेलार या दिनांक २९ डिसेंबर /२०२३ च्या मासिक सभेला गैरहजर राहिल्या असून दप्तरही उपलब्ध करून दिलेले नाही. ही बाब गंभीर असून ग्रामसेविकेवर कारवाई करण्याचा ठराव याच सभेत ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
ग्रामसेविका त्यांच्या वैयक्तीक कामासाठी गावात येऊन गेल्या परंतु पाण्यासारखा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असूनही ग्रामपंचायत कार्यालयात येवून सरपंचाना भेटून उपाययोजना केली नाही. ग्रामसेवक श्रीमती सुजाता शेलार यांचा मुजोरी व मनमानी कारभार चालू असून त्यांनी अफरातफर करून बेकायदेशीररित्या कर्मचा-याची नेमणूक करून ग्रामपंचायतीची व शासनाची फसवणूक केली आहे. याबाबतीत आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांचेकडे तक्रार करून तसेच आयुक्तांकडून कारवाई करणेबाबत आदेश आले असतांनाही ग्रामसेविकेवर, संबंधित बनावट कर्मचा-यावर व संबंधित अधिका-यांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांचे मनात नियमबाहय कामाची भिती उरलेली नाही. त्यांनी सरपंच व सदस्यांना मागणी करूनही ग्रामपंचायतीचे दप्तरअद्याप दाखविले नाही. ग्रामसेवक यांनी सरपंचांचे परवानगीविना दप्तर चोरून बाहेर नेले आहे व दप्तरात फेरफार केला असल्याचा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांना संशय आहे. ग्रामसेविका मुख्यालयी कधीही राहिलेल्या नाहीत तरीही त्या घरभाडेभत्ता घेवून शासनाची फसवणूक करत आहेत.
ग्रामसेविकेच्या अनेक गैरकारभाराबाबत तक्रारी दाखल असून त्याबाबत चौकशीचे आदेश असतांनाही कारवाई केलेली नाही. ग्रामस्थांचे पाण्याचे हाल होत असतांनाही वरिष्ठ अधिका-यांनी दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे ग्रामसेविका सुजाता शेलार यांच्यावर संबंधितांवर गुन्हा . दाखल करण्यात यावी यासाठी बोरघरच्या ग्रामस्थांनी दिनांक ३ जानेवारी रोजी खेड पंचायत समितीसमोर लक्षवेधी ठिया अंदोलन केले. यावेळी बोरघरचे ग्रामस्थ, पत्रकारवर्ग व गट विकास अधिकारी यांच्यात पाण्याचे समस्येवर मार्ग काढणेसाठी बैठक झाली. गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेविका शेलार यांना पाण्याच्या प्रश्नाबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पाण्याच्या प्रश्नासाठी सरपंच व ग्रामस्थ संध्याकाळी उशीरापर्यंत पंचायत समितीत थांबलेले असताना ग्रामसेविका शेलार या याबाबत कोणतेही गांर्भिय न बाळगता घरी निघून गेल्या.
अखेरीस ४ जानेवारी ला ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी स्वत:चे जबाबदारीवर नळपाणी योजनेच्या पंपाची व्यवस्था केली. त्यामुळे अशा मुजोर ग्रामसेविकेवर कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल व्हावा यासाठी ग्रामस्थांसह २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याचे बोरघरचे माजी सरपंच उदय बोरकर यांनी सांगितले आहे.










