लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रकार
खेड | प्रतिनिधी : रात्रीच्या वेळी गुपचूपपणे गावातील भरवस्तीतील शेतात घनगाळ नेऊन टाकल्याचा प्रकार लोटे परशुराम (ता. खेड) येथे समोर आला. या घनगाळामुळे संपूर्ण गावात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ए. बी. मौरी कंपनीला गुरुवारी जाब विचारला. मात्र, हा गाळ शेतकऱ्याच्या परवानगीने टाकल्याचे समोर आले. त्यानंतर ग्रामस्थांनी हा गाळ उचलावा, अशी मागणी केली.
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील ए. बी. मौरी कंपनीतील घनगाळ काढण्याचे काम कंत्राट येथील एका ठेकेदाराला दिले आहे. मागील काही दिवसांपासून हे काम सुरु आहे. हा घनगाळ संबंधित ठेकेदार पश्चिम महाराष्ट्रातील शेतात नेऊन टाकत आहे. मात्र, बुधवारी हा घन गाळ नजीकच्या घाणेखुंट गावातील शेतात टाकला जात असल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी डंपर थांबवून विचारणा केली असता तो घनगाळ या कंपनीचा असल्याचे सांगितले. याची माहिती ग्रामपंचायत व रहिवाशांना मिळताच त्यांनी कंपनीवर धडक दिली. मात्र, रात्री उशिरापर्यंत कुणीही अधिकारी समोर आला नाही.
संतप्त ग्रामस्थ गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जमा झाले. आणि कंपनी अधिकाऱ्यांना कार्यालयात येण्याची विनंती केली. मात्र, या विनंतीला केराची टोपली दाखविण्यात आली. अखेर ग्रामस्थांनी दुपारी बारा वाजता कंपनीवर धडक दिली. याचवेळी एमपीसीबी, महसूल व पोलिस यंत्रणा कंपनीत दाखल झाली होती. यावेळी संबंधित शेतकऱ्याच्या परवानगीने हा घनगाळ तेथे टाकल्याचे ही उघड झाले. मात्र, रासायनिक कंपनीचा घनगाळ आम्ही गावात टाकू देणार नाही, टाकलेला गाळ उचलून न्यावा, त्या संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी. कंपनीने या केलेल्या गुन्ह्यात त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनी बंदची नोटीस द्यावी, अशी मागणी करण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस व महसूलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करावी. तसेच गावात केलेल्या प्रदूषणाबाबत योग्य ती कारवाई होईल, असे सांगण्यात आले.आता कंपनीवर होणाऱ्याकारवाईकडे लक्ष लागले आहे.










