आजची पत्रकारिता ,ब्रेकींग न्यूज अन् विश्वासार्हता…!

संतोष वायंगणकर

आजच जग हे स्पर्धेच जग आहे असं म्हटलं जातय. जगभरामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या युगात तुम्हाला टिकून रहायच असेल तर जगाबरोबर धावायला शिकलच पाहिजे हे खरं आहे. परंतु या स्पर्धेत आपण धावत असताना काय मागे सुटत चाललय याचा विचार करायलाही आज कोणाकडे वेळ नाही. पत्रकारितेच क्षेत्र तर आज नुसती स्पर्धा नव्हे तर जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जात आहे. प्रिंट मिडिया आणि डिजिटल मिडिया या माध्यमातील दोन विभागांमध्ये पत्रकारिता विभागली गेली आहे. या दोन्ही माध्यमांमध्ये जे बदल गेल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये होत गेलेले आहेत ते पहाता गेल्या ३५ वर्षात या क्षेत्रामध्ये झपाट्याने प्रचंड बदल अनुभवता आले आहेत. आजच्या पत्रकारदिनी या सर्वांकडे मागे वळून पहाताना पूर्वीची पत्रकारिता बातमीची विश्वासार्हता टिकवुन ठेवण्यासाठीची धडपड आणि आजची पत्रकारिता बातमीच्या विश्वासार्हतेपेक्षा ‘पहले हम’ च्या स्पर्धेत लोकांसमोर पहिली ब्रेकींग आपलीच गेली पाहिजे यासाठीची जी काही धडपड आणि होणारी दमछाक ही चक्रावणारी आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये नियतकालिक सुरू केलं. बाळशास्त्री जांभेकर यांच्या ‘दर्पण’ सुरू करण्याला १९१ वर्षे झाली. या कालखंडात या क्षेत्रामध्ये एवढे अमुलाग्र बदल होत गेले की वर्षभरापूर्वीची पद्धती आज-काल बाह्य होते. इतका हा सारा बदल होत आहे. ज्या काळामध्ये स्व.बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ च्या माध्यमातून पत्रकारितेचा प्रारंभ केला. तो स्वातंत्र्यपूर्व काळ लोकशिक्षण आणि समाज सुधारणांचे विचार समाजाला देत रूढी, परंपरा यापासून दूर जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षणावर भर देण्याचा तो काळ लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांची पत्रकारिता ही स्वातंत्र्यलढ्याला विचार देऊन लोकजागृती करण्याचा तो काळ होता. ब्रिटीश सत्ताधाऱ्यांच्या अन्याया विरोधात पेटून उठण्याचा तो काळ होता. लोकमान्य टिळक यांच्या केसरीतील अग्रलेखांच्या विचारांनी भारावलेला तरूण स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात स्वत:ला सहज सामावुन घेत होता. त्यामुळे आजही जेव्हा पत्रकारांना समाजातील सर्वच घटकांकडुन लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्या पत्रकारितेतील आदर्शाची आठवण काहींकडुन करून दिली. स्व.बाळशास्त्री जांभकेर, लो.टिळक, आगरकर ही समाजसुधारणा आणि लोकजागृतीमधील फार मोठी व्यक्तिमत्व आहेत. परंतु या सर्वांची पत्रकारिता ही स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आहे. भारतरत्न, घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाला शिकण्याचा, शहाणे होण्याचे विचार दिले. गेल्या शंभर-दिडशे वर्षात सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत गेला आहे. वृत्तपत्रांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. डिजिटल चॅनलची संख्याही तशीच वाढत आहे. ब्रेकींग न्यूजची एक वेगळी पद्धत सुरू झाली. या ब्रेकींग न्यूज देण्याची स्पर्धा वाढतच चालली आहे. आज लोकांना गतीमानतेने कोणतीही घटना आपणापर्यंत पोहचली पाहिजे असे वाटणाऱ्यांची संख्या फारमोठी आहे. ब्रेकींग न्यूजमध्ये एखाद्या घटनेची मांडणी डिजिटल माध्यमांमध्ये झाली तरीही वाचक समजून घेतो. ब्रेकींग न्यूज देण्याच्या स्पर्धेत अशी काहीतरी चूक घडली तरीही प्रेक्षक दुर्लक्ष करतो. परंतु प्रिंटमाध्यमामध्ये फारच बारकाईने आणि लक्षपूर्वक जे सत्य आहे तेच देण्याचा प्रयत्न करावा लागतो. शेवटी पत्रकारितेचा आत्मा हा विश्वासार्हतेवरच अवलंबून रहाते. यामुळेच आजही माध्यम कोणतीही असोत परंतु पत्रकारांच्या क्रेडीट लाईनवर वाचक, प्रेक्षक बातमीची विश्वासार्हता ठरवतात. बदलत्या आणि माध्यमातील स्पर्धेतही ज्यांच्यापाशी विश्वासार्हता आहे त्यांचाच टिकाव लागू शकतो. भविष्यात ही स्पर्धा अधिक किचकट आणि गतीमान होईल. आपणालाही या अवती-भवतीच्या बदलाप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही या ब्रेकींग न्यूजच्या जमान्यात ‘विश्वासार्हता’ तितकीच महत्वाची ठरणार आहे. पत्रकारितेच भवितव्य हे याच विश्वासार्हतेवर तावून, सुलाखून निघत स्पर्धेतही टिकून राहू शकते. आज व्यक्त होण्यासाठी अनेक जागा व्यासपिठ सामान्य माणसाला उपलब्ध झाल्या आहेत. त्या व्यक्त होण्याच्या व्यासपिठावरही साधन सुचितेच पालन करीत पत्रकारितेची विश्वासार्हता जपली जाऊ शकते. एकिकडे प्रवाहासोबत चालत जायच की प्रवाहात वाहून जायच हे शेवटी आपणच ठरवायच आहे. पत्रकारितेतल्या या साऱ्या प्रवासात ज्या प्रतिकुलतेत आणि काळामध्ये पत्रकारितेचे आदर्श निर्माण केले आहेत. त्या आदर्शांना त्यांच्या विचारांना किमान अभिवादन करून आपली वाटचाल प्रामाणिकतेने करावयाला काहीच हरकत नसावी. आजच्या पत्रकारदिनाच्या निमित्ताने सर्वांनाच खुप साऱ्या शुभेच्छा !