अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण आले. या सोहळ्याला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आज या सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण आले. तसेच या सोहळ्याला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले आहे.
अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे अशी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. स्वर्गीय आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळा पाहणे ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट असल्याने अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.








