चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित शालेय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तसेच दशरथ दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूणमधील खेळाची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या पवन तलावच्या मैदानात मंगळवार दि. ९ ते ११ जानेवारी दरम्यान आयोजित १६ वर्षाखालील वयोगटातील चिपळूण तालुक्यातील शालेय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रांताधिकारी आकाश निगडे साहेब, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. राकेश चाळके, कृष्णा ऑक्सीडेंट कंपनीचे व्यवस्थापक श्री.पाटील साहेब, सती हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय वरेकर, माजी नगरसेवक कपिल शिर्के आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी प्रांताधिकारी आकाश निगडे साहेब यांची फलंदाजी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे साहेब यांची गोलंदाजी मैदानातील उपस्थित प्रेक्षकांना पाहण्यास मिळाली व त्यांनी देखील सिझन बॉल क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला.

स्पर्धेच्या उद‌्घाटन प्रसंगी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी मनोगत व्यक्त करताना या प्रकारच्या स्पर्धा चिपळूण नगरपरिषदच्या फंडातून घ्याव्यात, अशी मागणी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे साहेब यांच्याकडे केली. तसेच पुढील दोन महिन्यात “आमदार चषक” भव्य ओपन सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा या ग्राउंडवर घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील ८ शालेय संघाचा सहभाग असणार असून यातील सर्व सामने बाद पद्धतीने खेळवले जाणार आहेत.यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल पोफळी, अलोरे हायस्कूल, युनायटेड इंग्लिश स्कूल, एस.पी.एम स्कूल, ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल, मेरीमाता स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल सती, इंग्लिश मिडीअम स्कूल सती या आठ संघाचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेमध्ये चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन मार्फत प्रथम तीन क्रमांक प्राप्त संघास भव्य शिल्ड व मेडल, प्रत्येक सामन्यामधील सामनावीर खेळाडूला टी शर्ट, उत्कृष्ट फलंदाजास सिझन बॅट, उत्कृष्ट गोलंदाजास १२ सिझन बॉल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास शूज, मालिकाविरास सिझन स्पोर्ट्स कीट अशी भव्य स्वरूपाची बक्षीसे दिली जाणार आहेत. ग्रामीण भागामधून दर्जेदार लेदर बॉल क्रिकेट खेळाडू निर्माण व्हावेत व भविष्यामध्ये चिपळूण तालुक्यातून लेदर बॉल क्रिकेट खेळाडू भारतीय संघांमध्ये पोहोचावा हा प्रमुख उद्देश चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन यांनी व्यक्त केला. तरी या स्पर्धेचा आस्वाद तालुक्यामधील सर्व क्रिकेट प्रेमीनी घ्यावा असे आवाहन चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्यामार्फत अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी केले आहे.

या स्पर्धेच्या प्रसंगी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुचय रेडीज, सेक्रेटरी राजेश सुतार, खजिनदार विनीत देवधर, सदस्य सचिन कुलकर्णी, सुयोग चव्हाण, प्रशिक्षक उदय काणेकर, सहप्रशिक्षक इब्राहीम सरगुरोह, विक्रम भोसले, खेर्डी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष रियाज खेरटकर, खेर्डी ग्रामपंचायत सदस्य राकेश दाभोळकर, विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ अध्यक्ष शशांक भिंगारे, सचिन भोसले, साईराज सावंत, सुनील सागवेकर, वैभव गुरव, चिन्मय दाभोळकर, सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक आदी उपस्थित होते.