विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- राजेंद्र वारे
चिपळूण (प्रतिनिधी) : ज्ञानार्जनाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासात्मक प्रगतीकडे तेवढेच लक्ष देणे आवश्यक आहे यासाठी आमची प्रशाला कटिबद्ध आहे. आज शिक्षण पद्धतीत परीक्षा व गुणदान पद्धतीत बदल होत आहेत. या सर्व बाबींची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे व पालक शिक्षक व विद्यार्थी यांच्या संवादातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास नक्कीच होऊ शकतो, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचालित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच इयत्ता दहावी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा संपन्न झाली या सभेला २२५ पालक उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये पालक सभेचे नियोजन विद्यालयांमध्ये का आवश्यक आहे याची थोडक्यात कल्पना अशोक शितोळे यांनी दिली. पालकांची भूमिका, विद्यालयातील विविध उपक्रम, ज्यादा सराव परीक्षा, उत्तरपत्रिका लेखन शिबिर यासंबंधी उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली. इयत्ता दहावी वर्ग शिक्षकांनी वर्गवार पालक सभेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती दिली. यामध्ये सर्व शिक्षक सहभागी झाले होते. विद्यालयाच्या या पालक सभेला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी वर्षा चव्हाण यांच्या आभार प्रदर्शनाने पालक सभेची सांगता झाली.












