जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला आणखी एक झटका

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोकण विभाग रत्नागिरी सिंधुदुर्ग निरीक्षक चेतन दळवी शिवसेना शिंदे गटात

लांजा (प्रतिनिधी) रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरद पवार गट) पुन्हा एकदा जोरदार झटका बसला असून शरद पवार यांचे निष्ठावान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोकण विभाग रत्नागिरी सिंधुदुर्ग निरीक्षक चेतन दळवी यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला आहे .हा पक्षप्रवेश पाली येथील निवासस्थानी पार पडला.

लांजा तालुक्यातील खानवली गावचे सुपुत्र असलेले चेतन दळवी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात .युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत होते .त्याचप्रमाणे पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग रत्नागिरी सिंधुदुर्ग निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र चेतन दळवी यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. चेतन दळवी हे युवकांचे नेतृत्व अशी ओळख असून यापुर्वी त्यांनी खानवली सापुचेतळे या रस्त्यासाठी मोठे आंदोलन केले होते.

काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मयेकर यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. त्याच्या पाठोपाठ चेतन दळवी यांनीही पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी पालकमंत्री यांचे वडील, उद्योजक आण्णा सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.आण्णा सामंत यांनी त्यांचे पक्षाची शाल घालून स्वागत केले. यावेळी कार्यकर्ते वसंत घडशी, यशवंत वाकडे आदींसह अन्य उपस्थित होते.