वंदे भारतला थांबा मिळत नाही कसे ते पाहू- शौकत मुकादम
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणमध्ये २६ जानेवारीला सकाळी १०:३० वाजता सर्व पक्षीय रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला दहा हजार पेक्षा जास्त नागरिक सहभागी होतील असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे.
या आंदोलनामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागेल. यामध्ये आणखी काही मागण्याचा समावेश करण्यात आला आहे. चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर वंदे भारतसह आणखी चार गाड्यांना थांबा मिळावा. चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे ऑनलाईन भूमिपूजन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. तीन ते चार वर्षे झाले तरी या मार्गाचे कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. तरी वरील रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरु करावे. चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्थानकावरून अनेक वर्षाची मागणी केल्याप्रमाणे चिपळूण-दादर पॅसेंजर गाडी नव्याने सुरु करावी. तसेच चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील लेवल क्रोसिंग फाटक क्र. २० येथे उड्डाण पूल तातडीने बांधण्यात यावा यासह स्थानिकांच्या रेल्वेभरती अशा अनेक मागण्याच्या समावेश करण्यात आला आहे.
वरील मागण्या २६ जानेवारीच्या आत मान्य न झाल्यास चिपळूणच्या जंक्शन रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये चिपळूण सह गुहागर व खेड तालुक्यातील १५ गाव धामणंद, तसेच काडवली व परिसरातील नागरिक मोठ्याप्रमाणात सहभागी होतील. या आंदोलनाच्या संदर्भात कोकण रेल्वेचे चेअरमन, जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलिस अधिक्षक रत्नागिरी, क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी चिपळूण, डीवायएसपी चिपळूण, तहसिलदार चिपळूण, पोलिस निरीक्षक चिपळूण, सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण, सहाय्यक अभियंता कोकण रेल्वे चिपळूण, रेल्वे स्टेशन चिपळूण, रेल्वे पोलिस चिपळूण यांना कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी लेखी स्वरुपात कळविले आहे. या अगोदरच्या शौकत मुकादम यांनी केलेल्या अनेक आंदोलनाला नागरिकांचा मोठ्याप्रमाणात पाठींबा असतो व आंदोलनाला प्रचंड गर्दी होते हे रेल्वे प्रशासनाला माहिती असल्यामुळे रेल्वे प्रशासनाची धावपळ उडालेली आहे.












