तालुका काँग्रेस कार्यकारणी बैठकीत एकमुखी ठराव
उमेदवार स्थानिकच हवा अशीही मागणी
राजापूर (प्रतिनिधी): आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूका जर राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढविल्या जाणार असतील तर राजापूर विधानसभा मतदार संघ काँग्रेससाठी सोडला जावा व उमेदवार हा स्थानिकच असावा असा एकमुखी ठराव नुकत्याच झालेल्या राजापूर तालुका काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आला.
राजापूर तालुका काँग्रेस कार्यकारणीची महत्वपुर्ण बैठक नुकतीच काँग्रेसच्या तालुका संपर्क कार्यालयात काँग्रेसच्या माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे व तालुका अध्यक्ष किशोर नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना उ. बा. ठाकरे गटाचे आमदार व खासदार यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उ. बा. ठाकरे गट अशी महाविकास आघाडी आहे. मात्र राजापूर मतदार संघात उ. बा. ठाकरे गटाचे आमदार व खासदार विश्वासातच घेत नाहीत, विकास कामे असो, निधीचे वाटप असो, कामांचा शुभारंभ असो याबाबत कोणत्याही प्रकारे उ. बा. ठाकरे गटाकडून विश्वासात घेतले जात नाही असा आरोप काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूका जर राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढविल्या जाणार असतील तर राजापूर विधानसभा मतदार संघ काँग्रेससाठी सोडला जावा व उमेदवार हा स्थानिकच असावा असा एकमुखी ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्याने राजापूरच्या विकासाला खिळ बसत असल्याचेही यावेळी नमुद करण्यात आले. त्यामुळे स्थानिकच उमेदवार असावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शहरासह ग्रामीण भागात पक्ष संघटना अधिक बळकट करताना बुथ कमिटया गठीत करणे, घराघरात पक्षाचे काम पोहचविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीत नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष किशोर नारकर, व शहर अध्यक्ष आजिम जैतापकर यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बैठकीला माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे, महमदअली वाघू, माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर, सुलतान ठाकूर, आसिफ मुजावर, सौ. स्नेहा कुवेसकर, रघुनाथ आडिवरेकर, जितेंद्र खामकर, तालुका महिला आघाडी प्रमुख सौ. सावित्री कणेरी आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











