दलवाई हायस्कूलची दांडी सत्याग्रह शोभायात्रा ठरली लक्षवेधी
सोशल मिडीयाचे दुष्पपरिणाम नाटीकेने प्रेक्षक विचारमग्न; कचरा डान्सही ठरला सरस
चिपळूण (प्रतिनिधी) : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रोत्साहन मंडळ संचलित दलवाई हायस्कूल प्राथमिक व माध्यमिक विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलन नक्षत्र २०२४ सोहळा नुकताच संपन्न झाला. यात कांदा न भाकर खावद्या कीर या गाण्यावरील बुटका डान्सने धम्माल उडवली. विद्यार्थ्यांनी काढलेली दांडी-सत्याग्रह शोभायात्रा लक्षवेधी ठरली. चिमुकल्यांनी सादर केलेल्या सोशल मिडीयाचे दुष्पपरिणाम नाटीकेने उपस्थितांना विचार करायला लावला. कचरा डान्सही सरस ठरला. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, शाळेचे माजी मुख्याध्यापक व संस्थेचे उपाध्यक्ष सिराज दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन खलील दलवाई, सेक्रटरी जहीर दलवाई, स्कूल कमिटी चेअरमन खालीद दलवाई, प्राथमिक विभागाचे अध्यक्ष राजेश जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश खेडेकर, विश्वस्त सुभाष नलावडे, मुख्याध्यापक रोहीत जाधव, खजिनदार रविंद्र पवार, संचालक मोहन फागे, मंगेश चव्हाण, नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कूलचे चेअरमन हैदर दलवाई, खजिनदार इब्राहिम दलवाई, डॉ. अमानुल्ला दलवाई आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी शिशुविहार ते चौथीच्या बालकलाकारांनी देवा श्री गणेशा, आंबा बाजला गो, दिल है छोटासा, स्कूल चले हम, सांझ ये गोकुळी, मनवा लागे, रमाचं नांदणं, अंगात आलय अशी एकापेक्षा एक सरस नृत्य, संगीत सादर केली. इंग्रजीतून सादर झालेले जंक फूड, हेल्दी फूड व सोशल मिडीयाचे दुष्पपरिणाम ही नाटके सर्वांना विचार करायला लावणारी ठरली. दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन झाले, यात ५ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती विविधतेतील एकता या विषयावरील भारतीय लोकनृत्य कलेचे विविध कार्यक्रम सादर केले. दांडी-सत्याग्रह शोभायात्रा, शिवचरित्र व शाळानाटिका हे स्नेह संमेलनाचे खास आकर्षण ठरले. दीपनृत्य, भीमगीत, शिवाजी महाराज, झुमकावाली पोरं, लावणी, टिपरी नृत्य, नगाडा, भारूड असे अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर केले. यात कांदा न भाकर खावद्या कीर या गाण्यावरील बुटका डान्सने तर धम्माल उडवली, कचरा डान्सही सरस ठरला.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आपण कामात कितीही व्यस्त असलो तरी मुलांचे कौतुक करण्यासाठी शाळांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांवेळी पालकांनी आवर्जून वेळ काढण्याचे आवाहन केले.












