भाजपा युवा मोर्चा आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे प्रथमेश तेली यांच्या हस्ते उद्घाटन

‘नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ ‘ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते झाले.

यावेळी वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष राजन गीरप, वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, विधानसभा क्रिडा आघाडी प्रमुख निशांत तोरसकर, प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, केतन आजगावकर, रवींद्र प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १७ जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तिन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय नमो चषक २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने वेंगुर्ले तालुक्यात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेने नमो चषक स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

संपूर्ण सावंतवाडी मतदारसंघात ‘नमो चषक २०२४ ‘ च्या निमित्ताने बॅडमिंटन, कॅरम, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ व १८ जानेवारी या दोन दिवशी बॅडमिंटन पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी अशा दोन गटात या स्पर्धा तर १८, १९ व २० जानेवारी दरम्यान सावंतवाडी जिमखाना मैदानावर सावंतवाडी शहर मर्यादित क्रिकेट स्पर्धा होणार आहे. तसेच माडखोल जि.प. मतदारसंघ येथे कलंबिस्त चव्हाटा मैदानावर २० व २१ जानेवारी दरम्यान स्पर्धा होणार आहेत. तर इन्सुली कारखान्याजवळील मैदानावर २० व २१ जानेवारी दरम्यान स्पर्धा होणार आहेत.

तसेच २३ जानेवारीला प्रकाशझोतात सावंतवाडी जिमखाना मैदानावर रस्सीखेच स्पर्धा सायंकाळी सात वाजता होणार आहे. २१ जानेवारीला सावंतवाडी जिमखाना मैदान येथील बॅडमिंटन हॉल येथे बुद्धिबळ स्पर्धा, सावंतवाडी जिमखाना मैदानावर २४ जानेवारीला कबड्डी स्पर्धा होणार आहेत. याबाबतची माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली व यांनी दिली.
वेंगुर्ले येथील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे नियोजन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, सुधीर आडिवरेकर, रवींद्र प्रभू देसाई आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे. तरी या सर्व स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त खेळांडूनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चा व भाजपातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, गुरुवारी १८ जानेवारी रोजी सावंतवाडी शहर मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते होणार आहे. ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून या स्पर्धेचाही क्रिकेट प्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहर कार्यकारणी तर्फे करण्यात आले आहे.