वीरेंद्र चव्हाण यांच्या रिक्षेवर श्री राम प्रतिमेसह भगवा फडकला

रत्नागिरी : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्री राम मंदिर, मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज झाला आहे. सर्वत्र प्रभू श्रीरामाचा जयजयकार सुरू असून भगवे झेंडे, मंदिरांमध्ये विविध धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यातून प्रेरणा घेऊन कर्ला-आंबेशेत येथील रिक्षाचालक वीरेंद्र चव्हाण यांनी रिक्षेवर प्रभू श्रीराम असलेला भगवा झेंडा फडकावला आहे.

वीरेंद्र चव्हाण हे रिक्षा चालवतात. ते प्रभू श्रीरामाचे भक्त असून राम मंदिर झाल्यामुळे देशभरातील उत्साहाने ते सुद्धा आनंदित झाले आहेत. झब्बा, लेंगा आणि पांढरी टोपी अशा पारंपरिक वेशभूषेत तो रिक्षा चालवत आहे. तसेच कोणीही प्रवासी आला की जय श्रीराम जय श्रीराम असा जप ते करत आहेत. श्री. चव्हाण हे साई भक्तसुद्धा असून यापूर्वी ते पायी शिर्डीला गेले होते. रिक्षावाल्यांबद्दलचे समाजातील चित्र आपण चांगल्या वागणुकीतून बदलू शकतो, असा त्यांनी निर्धार केला असून आपल्या कृतीतूनही त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे.
काही वेळा घाईगडबडीमध्ये विद्यार्थी प्रवासी पैसे आणायला विसरतात. त्यावेळी नंतर भेटलास की पैसे दे, असे चव्हाण सांगतात. शिवाय आता जाण्याचे पैसे देऊ का? असे विचारणारे चव्हाण हे प्रेमळ आहेत. चवंडेवठार येथील एक महिला पैशाने भरलेली पर्स रिक्षात विसरली होती. नातेवाइकांच्या मदतीने पत्ता शोधून ती चव्हाण यांनी ती पर्स त्यांना परत केली. तसेच एका मुलाचा मोबाईल रिक्षातून उतरताना पडला. तो त्याला कळलाच नाही. काही वेळाने मोबाईल वाजू लागला, तेव्हा ते चव्हाण यांनी मालकाचा शोध घेऊन तो मोबाईल त्याने परत केला आहे.