मोबाईल चोरट्यांच्या चार तासात आवळल्या मुस्क्या ; वैभववाडी पोलिसांची कारवाई

वैभववाडी | प्रतिनिधी
वैभववाडी शहरात मोबाईल शॉपीतुन मोबाईल चोरणाऱ्या दोघांना चार तासात मोठ्या शिताफिने पकडत तेरा हजाराचा मुद्देमाल वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.बाजारपेठेतील एसटी स्टँड समोरील प्रथमेश मोबाईल शॉपी मधून मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने अर्जुन दीपचंद चव्हाण व अवदेश लाल बिहारी चव्हाण रा. आजमगड, उत्तरप्रदेश या दोघांनी प्रवेश केला. दरम्यान मालकाची नजर चुकऊन ते मोबाईल चोरून पसार झाले .
ही गोष्ट कामगाराच्या लक्षात येताच नवीन मोबाईल गायब झाल्याचे शॉपीचे मालक प्रथमेश रावराणे यांना सांगितले. रावराणे यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून दोघा संशयीतांचे फोटो व्हायरल केले व या संदर्भात वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली.फोटो पाहून वैभववाडीतील त्यांच्या मित्राने ते राहत असलेले ठिकाण सांगितले. वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस अभिजीत तावडे, पोलीस जायभाय, मारुती साखरे, श्री. बिलपे यांनी शहरातील डांगे चाळ येथे जाऊन संशयीताना मुद्देमालासह ताब्यात घेतले.