जोपर्यंत शासनाकडून शिक्षणामध्ये अधिक गुंतवणूक होणार नाही तोपर्यंत शिक्षणाचा दर्जा वाढणार नाही : प्राचार्य सुनीलकुमार लवटे

Google search engine
Google search engine

वेंगुर्ले येथे शिक्षण परिषद संपन्न : राज्यातील गुणवंत १०० शिक्षकांचा झाला सत्कार

वेंगुर्ले : दाजी नाईक
जोपर्यंत शासनाकडून शिक्षणामध्ये अधिक गुंतवणूक होणार नाही तोपर्यंत शिक्षणाचा दर्जा वाढणार नाही, शैक्षणिक आरोग्य फारस बरं नाही याला आपणच जवाबदार आहोत, असं सतत शासन सांगत आहे. मात्र ते हे कधीच सांगणार नाही की नव्या आर्थिक व शैक्षणिक धोरणा मध्ये शिक्षणावर जादा खर्च करू. सद्या शिक्षणावर केवळ एकूण ६ टक्के खर्च होतो. २०१३ साली या नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा प्रकाशित करण्यात आला होता. त्यामध्ये सरकारी खर्चाच्या २० टक्के खर्च शिक्षणावर करण्याचा मसुदा होता, मात्र २०१३ ते २० या सात वर्षात २० टक्क्याचे प्रमाण आज ६ टक्के झाले. हे भीषण आहे असे मत प्रमुख वक्ते जेष्ठ विचारवंत, प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले.
वेंगुर्ला-कॅम्प येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती १७ वे त्रैमासिक राज्य महाअधिवेशन राज्यस्तरीय शिक्षण परिषद व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ विचारवंत, प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती राजाध्यक्ष उदय शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माजी राज्याध्यक्ष सावळाराम अणावकर, सल्लागार चंद्रकांत अणावकर, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस विजय कोंबे, माजी राज्याध्यक्ष नाना जोशी, शिक्षक नेते शिवाजीराव साखरे, राज्यकोषाध्यक्ष केदु देशमाने, राज्य संपर्क प्रमुख राजेंद्र खेडकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, जेष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर, माजी राज्याध्यक्ष काळू बोरसे पाटील, बळीराम मोरे, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सिताराम लांबर, राज्य महिला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे ,कोकण विभाग प्रमुख अंकुश गोफणे आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी सावंतवाडी येथील शिक्षक सागर पाटील यांचे काल हृदयविकाराने निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना श्री. लवटे म्हणाले की, शासन आता शिक्षणावर जो खर्च करत आहे तो नाइलाजाने करत आहे. पुढील काळ बिकट असल्याने भविष्यात अशा संघटनांची आवाज उठविणे जास्त गरज निर्माण झाली आहे. जगात एक नंबर शिक्षण देणारा देश होण्याचे स्वप्न भारताचे आहे. पण आज जगात एक नंबर शिक्षण देणारा देश फिनलंड आहे. फिनलंड हा जगातील देश वर्षोनुवर्षे एक नंबर आहे त्याचे कारण टीचर ऍकडमी हि फिनलंड मध्ये शिक्षणावर नियंत्रण ठेवते. मात्र आपल्या देशात शासन सांगतात आणि शिक्षक त्याची अंमलबजावणी करतो. यात बदल होणे अपेक्षित आहे याची कारणे अनेक उदाहरण मधून त्यांनी सर्व उपस्थित शिक्षकांना पटऊन दिली.
तर सिंधुदुर्ग शिक्षणाधिकार महेश धोत्रे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्यांदा होत असलेल्या या महाअधिवेशन चा प्रारंभ कला ,क्रीडा,व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वेंगुर्ला नगरीत राज्य गीताने होत आहे हे अभिमानास्पद आहे. कोविड परिस्थितीत शिक्षक धीराने, संयमाने, डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्याप्रमाणे सामोरे गेले तसेच उपलब्ध माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला. कोविडजन्य काळात स्थानिक परिस्थिती बघून विविध उपक्रम राबवले आणि शैक्षणिक प्रगतीत अग्रेसर राहिले, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शैक्षणिक तसेच संघटन क्षेत्रात राज्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये शिवराम किनरे (रत्नागिरी), चौधरी इब्राहिम अमीन(औरंगाबाद), नितीन डाबरे(वर्धा), विद्याधर भाट (कोल्हापूर), सचिन मदने (सिंधुदुर्ग) आदीसह १०० शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना राज्य सरचिटणीस विजय कोंबे, निवेदन चंद्रसेन पाताडे तर आभार सचिन मदने यांनी केले.