खेड(प्रतिनिधी) खेड दुर्ग सहयाद्री ट्रेकर्स, श्रीमान चंदुलाल शेट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, किल्लेमाची ग्रामस्थ मंडळ व किल्लेमाची उत्कर्ष मंडळ ठाणे-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गांच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी तालुक्यातील किल्ले घेरापालगडावर २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
स्वतंत्र, सार्वभौम स्वराज्याला बळकटी देण्याच्या उद्देशासह स्वकियांच्या प्रचंड आग्रहामुळे तसेच बलाढ्य शत्रूंना वचक बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून१६७४ रोजी स्वतः स्वराज्याभिषेक करून घेतला. या अलौकिक अद्वितीय घटनेला २०२४ रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर किल्ले घेरापालगडावर शिवरायांना मंत्रघोषात जलाभिषेक करून किल्ल्यावर चढाई करत मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर ध्वजारोहण होईल.










