मंडणगड l प्रतिनिधी : रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) तालुका शाखेचेवतीने तालुक्यातील दहा महत्वाचे प्रश्नासाठी प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागण्यासाठी मंडणगड तहसिल कार्यालयाचेवतीने राज्याच्या मुख्यमंत्र्याकरिता 17 जानेवारी 2024 रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनातील माहीतीनुसार रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत म्हाप्रळ पुलाचे शेजारी नवीन पूल बांधणे, बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड मुंबई या संस्थेचा रत्नागिरी जिल्ह्याचे सरहद्दीवर मौजे म्हाप्रळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व नावासह प्रवेशद्वार आणि पर्यटकांसाठी निवासस्थान बांधणे करिता म्हाप्रळ येथील शासकीय भूखंडापैकी १० गुंठे भूखंड मागणी प्रस्ताव मंजूर करणे बाबत, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब यांचे मूळगाव आंबडवे येथे उभारण्यात आलेल्या मॉडेल कॉलेजचे अपूर्ण बांधकाम त्वरित सुरू करून पूर्ण करणे, मंडणगड तहसील कार्यालयाची इमारत जुनी व नादुरुस्त असल्याने नवीन इमारत बांधणे करिता तांत्रिक व आर्थिक तरतूद करून नवीन इमारत बांधणे बाबत, बाणकोट सागरी पोलीस ठाणे ता. मंडणगड येथील अधिकारी व कर्मचारी यांना निवासाची व्यवस्था करणे, नवीन वाहन परवाना व नूतनीकरण (पासिंग) व्यवस्था पूर्वीप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करणेबाबत,
मंडणगड तालुक्यामधून महाड तालुक्याकडे क्षमतेपेक्षा जास्त व बेशिस्तपणे सुरू असलेल्या गौणखनिज (मायनिंग) वाहतूकीस आळा घालणेबाबत, मंडणगड तालुक्यातील शासकीय कार्यालयामधील रिक्त पदे त्वरित भरणे बाबत, आंबडवे ते पंढरपूर राज्य मार्गाचे मंडणगडच्या हद्दीतील काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असले बाबत. मंडणगड तालुक्यामधील 108 ॲम्बुलन्स सेवा न मिळाल्याने रुग्णांचे हाल होत असले बाबत. अशा दहा समस्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. या समस्यावर तोडगा न निघाल्यास पार्टीचे तालुका शाखेचे वतीने प्रजासत्ताक दिनी बेमुदत धरणे-आंदोलन/उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावार तालुका शाखेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष राजेश गमरे, राजेश साळवी, राजेश खैरे. गणेश जाधव, महेंद्र यादव, दिनेश राउत, जयवंत जाधव, सुनील मोरे, बाळाराम येलवे, पांडुरंग जाधव, वैभव जाधव, प्रतिक गमरे, सागर खैरे यांच्या सह्या आहेत.











