मंडणगड l प्रतिनिधी : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासन, तहसील कार्यालय, निवडणूक विभाग मंडणगड व एन. एस. एस. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मतदान यंत्र जनजागृती व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून मंडणगडचे मंडळ अधिकारी श्री. निलेश गोडघासे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी मंडणगड तहसीलदार कार्यालयातील श्री. उमेश कदम, तलाठी श्री. मनोहर पवार, उपप्रचार्य डॉ. वाल्मिक परहर, कार्यक्रमाधिकारी प्रा. शरिफ काझी, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. संगीता घाडगे, डॉ. अशोक साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडळ अधिकारी श्री. निलेश गोडघासे यांनी सांगितले की, दिवसेंदिवस कमी होत चाललेली मतदानाची टक्केवारी लक्षात घेऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याबाबत जनजागृती करणे गरजेचे बनले आहे. विद्याथ्र्यांनी मतदानाबाबत आपल्या परिसरात जनजागृती करणे आवश्यक आहे. आपल्या देशात लोकशाही टिकवायची असेल तर एक चांगला व सक्षम उमेदवार निवडण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर तलाठी श्री. मनोहर पवार यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनविषयी विद्यार्थी व शिक्षकांना सविस्तर माहिती सांगितली व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. शेवटी प्रा. हनुमंत सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.









