चिपळुणात खेडेकर संकुलात २७ रोजी “निर्भय बनो” जाहीर सभा

पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली माहिती

डॉ. विश्वंभर चौधरी व एडवोकेट असीम सरोदे करणार मार्गदर्शन

चिपळूण ( वार्ताहर) : देशाची लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल तर 2024 मध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जातीवादी व भांडवलदार धार्जिणे सरकार सत्ताभ्रष्ट केले पाहिजे.यासाठी लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे. त्याच अभियानाचा एक भाग म्हणून रत्नागिरी चिपळूण शहरांमध्ये प्रथमच निर्भय बनो जाहीर सभेचे आयोजन शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल चिपळूण येथे करण्यात आले आहे. या सभेला निर्भर बनो अभियानाचे संस्थापक डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि एडवोकेट असीम सरोदे हे मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती धवल घाग मार्ट येथे पत्रकार परिषदेमध्ये संयोजक यांनी दिली

या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना संयोजक ऍड किशोर वरक, राजन इंदुलकर भरत लब्धे, सचिन मोहिते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या देशांमध्ये जे राजकारण सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन आयुष्य कठीण झाले आहे. संविधानाची तोडफोड करत संसदेमध्ये अनेक लोक विरोधी कायदे संमत केले जात आहेत. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवर अत्याचार, शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार इत्यादी मूलभूत प्रश्नाकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून धर्म धर्मांच्या अस्मितांमध्ये सर्व लोकांना गुंतवून ठेवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारी उद्योगांचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे.

कमी पटसंख्येच्या नावाखाली हजारो शाळा बंद करून बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. देशात काही ठराविक भांडवलदारांना आणि गुंतवणूकदारांचे हित साधण्याचा प्रयत्न केला जात आहे . शेतकरी आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्या जात आहेत . कामगारांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेले कायदे बदलून भांडवलदारांना उपयोगी पडतील असे कायदे सोयीनुसार तयार करण्यात येत आहेत.

विकासाच्या नावाखाली पर्यावरण बिघडवले जात आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा गौरव होतो तीच लोकशाही आता हुकूमशाहीच्या दिशेने प्रवास करीत आहे प्रसार माध्यमांचे स्वतंत्र काढून घेतले जात आहे. अशा अनेक समस्या सध्या सर्वसामान्यांना देशाचे नागरिकांना भेडसावत आहेत. यासाठीच निर्भय होऊन या व्यवस्थेच्या विरोधात संघटितपणे लढा उभारून सामोर गेले पाहिजे.

लाखो शहिदांच्या बदल्यातून मिळालेले स्वातंत्र्य धोक्यामध्ये आले असताना आज आपण शांत राहिला तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. यासाठीच प्रबोधन करण्याच्या उद्देशाने निर्भय बनो अभियानाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना देशभर एक चळवळ उभी करण्यात येत आहेत.

या चळवळीचा भाग म्हणून चिपळूण येथे शनिवार २७ जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल नगरपरिषद चिपळूण येथे या निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आयोजनामध्ये अनेक सामाजिक संस्था आणि समाजशील कार्यकर्ते या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. सभेला डॉक्टर विश्वंभर चौधरी व अडवोकेट असीम सरोदे हे मार्गदर्शन करणार आहेत.

यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत भरत लब्धे, ऍड किशोर वरक, श्रमिक संयोग संस्थेचे राजन इंदुलकर ,सचिन मोहिते, सुरेश पाथरे,श्री होमकळस, दादा आखाडे, मैंनूद्दीन सय्यद, दिनेश माटे, सुधीर गमरे यांनी निर्भय बनो याबाबत माहिती दिली. सदर संयोजक असणाऱ्या सर्वांनीच निर्भय बनो जाहीर सभेला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुद्धा केले आहे.