पाग येथील महेश कांबळी यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण (प्रतिनिधी) : नगर पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अनधिकृत बांधकामे व पाग येथील समाज मंदिराच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात कारवाईचे कोणतेही पाऊल उचलले जात नाही. यामुळे या समस्यांना वाचा फोडण्यासाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी नगर पालिक कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी येथील रहिवासी महेश महादेव कांबळी यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
यासंदर्भात महेश कांबळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराला खूप सारे प्रश्न भेडसावत आहेत. त्यापैकी पूर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य नागरिक रितसर पैसे भरून नगर पालिकेची परवानगी घेऊन बांधकामे करीत आहेत. असे असताना शासनाने मारलेली लाल व निळी पूररेषा विसरुन कुणाच्या तरी वरदहस्ताने धनदांडगे लोक मात्र अनधिकृत बांधकामे करीत आहेत. शहरातील एका ठिकाणी आपण महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ कलम ५३ (१) अन्वये दि. २३ मे २०२२ व दि. २५ मे २०२२ रोजी नोटीस बजावून सूचना दिली होतीत. मात्र, तरीही त्या ठिकाणी अनधिकृत काम पूर्ण करुन प्रशासनाला जुमानण्यात आलेले नाही. याविषयी आपण स्वतः लक्ष देत नाही. पाग परिसरातील समाज मंदिर (सावंत गल्ली) उभारण्यात आले आहे. या कामाचे लाईन आऊट दि. २ नोव्हेंबर २०२१ रोजी दिले व ७ डिसेंबर २०२२ रोजी काम पूर्ण झाले. पावसाळी ६ महिने सोडून काम पूर्ण झाल्याचे सांगून त्याची बिले काढण्यात आली.
आज डिसेंबर २०२३ रोजी हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून ते जागोजागी लिकेज आहे. फ्लोरिंग उखडलेल्या अवस्थेत आहे. आतमध्ये गाढवं, कुत्री, गायी यांचा वावर आहे. समोरील कंपाऊंड अर्धवट स्थितीत आहे. संपूर्ण इमारत ही शेवाळयुक्त आहे. निकृष्ट दर्जाचा उत्कृष्ट नमूना असे काम झालेले आहे. या कामाची आपण चौकशी करीत नसल्याने माझ्याकडे उपोषणा व्यतिरिक्त कोणताही मार्ग उरलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मला नगर परिषद कार्यालयासमोर येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी २६- जानेवारी २०२४ रोजी उपोषणाला बसावे लागत आहे. माझ्या जीवितास कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील, असेही श्री. कांबळी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.












