अर्चना घारे -परब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्ग । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाचा सर्वे लवकरात लवकर पूर्ण करावा तसेच ज्या कुणबी नोंदी सर्वे करताना आढळल्या आहेत त्या त्वरीत अपलोड कराव्यात व त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन केली.
याबाबत जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गरजवंत मराठ्यांचा आरक्षणासाठीचा लढा सबंध महाराष्ट्रभर सुरू आहे. त्याचाच भाग म्हणुन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा या मध्ये सर्वात पिछाडीवर आहे. सर्वात कमी नोंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या दिसत आहेत.
तरी आपल्या स्तरावरून जातीने लक्ष घालून, सर्व यंत्रणा प्रभावी पणे राबवून, सापडलेल्या व नवीन सापडणाऱ्या सर्व नोंदी लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसे न झाल्यास राष्ट्रवादीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
सदर निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडून शिंदे समितीला पाठवण्यात आले आहे. त्यांच्याकडूनही पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती अर्चना घारे परब यांनी दिली आहे.








