कणकवली : राधानगरीहून सिंधुदुर्गला विद्युत पुरवठा करणारा शिवडाव येथील ११० केव्ही लाईनचा २५ मीटर उंचीचा मनोरा २६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञाताने गॅसकटरने कापून खाली पाडला होता. महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंता रुपेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने काम करत तो पुन्हा उभा केला आहे. तसेच वीजपुरवठा पूर्ववत सुरू करत ग्राहकांची गैरसोय दूर केली आहे.
महापारेषणकडून या घटनेबाबत कणकवली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. चालू स्थितीतील हा मनोरा ११ केव्ही लाईनवर पडल्याने शिवडाव परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तो आता पूर्ववत करण्यात आला आहे. वीज मनोरा गॅसकटरने कापून खाली पाडला. याबाबत राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अधिकारी संजय कळविकट्टे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
त्या मनेरा दुरुस्तीचे काम महापारेषणकडून तातडीने हाती घेण्यात आले. रात्रंदिवस काम करून मनोरा उभा करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता रुपेश गायकवाड, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय कळविकट्टे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून ११० केव्हीचा मनोरा पुन्हा उभा करून विद्युत पुरवठा पूर्ववत चालू केला.
त्यांना महापारेषण अधीक्षक अभियंता प्रांजल कांबळे व महापारेषण मुख्य अभियंता शिल्पा कुंभार यांनी मार्गदर्शन केले.











