राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाचे कलाशिक्षक बाळासाहेब पाटील यांना प्रदान

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार २०२४ आजगांव-भोमवाडीचे बाळासाहेब आबाजी पाटील यांना संघटनेचे राज्य अध्यक्ष नरेंद्र बाराई व राज्य उपाध्यक्ष बलराम सामंत यांचे हस्ते व राज्य सचिव दिगंबर बेंडाळे, कोकण विभागीय उपाध्यक्ष रूपेश नेवगी, प्रकाश महाभोज, संभाजी कोरे, राजेश आजगांवकर, समिर चांदरकर, तुलशिदास कुबल, योगेश गावीत, राजेंद्र कोयंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे व जिल्हा शाखा पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कला शिक्षकांची ४२ वे कला अधिवेशन बोर्डी समुद्रकिनारी डहाणू जिल्हा पालघर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयामध्ये २००५ पासुन बाळासाहेब आबाजी पाटील हे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २००६ पासून ते आजतागायत इलेमेंटरी व इंटरमिजीएट या शासकीय परिक्षेचा निकाल १०० टक्के लावला आहे. त्याच बरोबर २०२३ मध्ये राज्यव्यापी सकाळ बाल चित्रकला स्पर्धेत त्याच्यां विद्यार्थ्यांनी अ गटामध्ये राज्यात पहिला तर ड गटामध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच विविध चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसे मिळवली आहेत.

या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात ही पाटील सर सक्रीय असतात. दरवर्षी दोन दिव्यांग विद्यार्थी शैक्षणिक दत्तक घेतात. तसेच त्यानी २०२३ या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त ७५ अपंग व्यक्तींचा दीड कोटी रूपयांचा प्रत्येकी दोन लाखाचा खर्चाने लाइफ टाइम हप्ते भरून दिव्यांगाप्रती कार्य केले आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन वरील राज्य स्तरीय कलाध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार कामी सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघटनेचे सहकार्य लाभले.

हा पुरस्कार मिळाल्यामुळे संस्थेच्या वतीने अध्यक्षा रेखाताई गायकवाड व मुख्याध्यापक सतीश उकरंडे, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सत्कार करून अभिनंदन केले. ज्यांच्या मुळे राज्य आदर्श कलाध्यापक पुरस्कार मिळाला त्या कर्णबधिर विद्यार्थ्यांना पाटील यांनी हा पुरस्कार समर्पित केला आहे.