तीन डंपर ताब्यात : कालावल खाडी पात्रात तीन वाळू उत्खनन होड्याही बंदर विभागाने केल्या सिल
मालवण | प्रतिनिधी : अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीवर तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनखाली प्रशासनाने दोन दिवसात धडक कारवाई करत तीन डंपरवर कारवाई केली. यातील एक डंपरला १ लाख २८ हजार दंड करण्यात आला. तर दोन डंपरवर कारवाई प्रक्रिया सूरू होती.
दरम्यान, बंदर विभागाच्यावतीने कालावल खाडीपात्रात कारवाई करत तीन होड्या जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या होड्या सील करून ठेवण्यात आल्या आहेत.
तहसीलदार वर्षा झालटे व नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात मंडळ अधिकारी स्तरावर कारवाईसाठी टिम नियुक्त करण्यात आलेले आहेत. या टिम कडून बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी कारवाई केली जात आहे. यापूर्वीही अनेक वेळा तहसीलदार वर्षा झालटे यांनी कारवाई केली आहे.
मालवणचे मंडळ अधिकारी पिटर लोबो आणि तलाठी गौरव दळवी यांनी चौके आंबेरी कुडाळ मार्गांवर बुधवारी एका वाळू डंपरवर कारवाई केली. तहसीलदार यांनी या डंपरवर १ लाख २८ हजार ८०० रूपयांचा दंड केला. डंपर मालकाने दंड जमा केल्यानंतर गाडी तहसील कार्यालय येथून सोडण्यात आली.
गुरूवारी पोईप मंडळ अधिकारी संतोष गुरखे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी योगेश माळी व दिलीप ठाकूर यांच्या पथकाने हिवाळे मार्गावर दोन डंपर पकडले. दोन्ही डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेले आहेत. या डंपरमधून वाळू वाहतूक करण्यात येत होती. दोन्ही गाड्यांवर दंडात्मक कारवाईची कार्यवाही सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, दंडात्मक कारवाई करून संबंधित गाडी चालकांनी दंडाची रक्कम भरली नाही तर सरकारी मालमत्तेची चोरी करण्यात आल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत वाळू उत्खननामध्ये सहभागी वाळू कामगार यांच्यावर वरिष्ठ मार्गदर्शन खाली पथक तैनात करून कारवाई केली जाणार आहे. असे महसूल प्रशासन यांनी सांगितले.











