खेड(प्रतिनिधी) एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या जीविताशीच सुरू असलेला खेळ अद्यापही कायमच आहे. बुधवारी रात्री १० वाजता येथील बसस्थानकातून सुटणाऱ्या खेड- बोरिवली बसचे स्टेअरींग चक्क मद्यधुंद चालकाच्या हाती दिल्याचा प्रकार उघडकीस आला.
बसस्थानकातील फलाटालगतच्या भिंतीला बस धडकल्यानंतर चालक मद्यधुंद असल्याचे निदर्शनास आले. यामुळे मोठा अनर्थ टळला. मद्यधुंद अवस्थेतील मंगेश आहाटी या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले
लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात बस घेवून जाणारे बहुतांश चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. मद्यधुंद चालकांमुळे प्राणांतिक अपघातांसह छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. या साऱ्या घटना घडून देखील एसटी प्रशासनाकडून मात्र अजूनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बसस्थानकातून रात्री १० वा. सुटणारी खेड- बोरिवली बस घेवून चालक मंगेश आहाटी बसस्थानकात येत असताना अचानक नियंत्रण सुटल्याने बस बसस्थानकाच्या भिंतीला धडकून अपघात घडला. अपघातानंतर चालक बसच्या खाली उतरला असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास येताच या बाबत एसटी प्रशासनासह पोलीस स्थानकात कळवण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून परिस्थितीची पाहणी केली. या दरम्यान, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी ताब्यात घेतले.
हा प्रकार वेळीच उघडकीस आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या मद्यधुंद अवस्थेतील चालकाबाबत प्रवाशांनी यापूर्वीही तक्रारी नोंदवत कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्याकडे एसटी प्रशासनाने कानाडोळाच केल्याने प्रवाशांच्या जीविताशी खेळण्याचाच प्रकार सुरू असल्याचे यावरून दिसत आहे.









