पदवीधर शिक्षक अशोक धनावडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल हृद्य सत्कार
चिपळूण (प्रतिनिधी) : गावागावातील शाळा वाचल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील मराठी शाळा बंद होता कामा नयेत. आपण खडतर कष्टातून शिक्षक झालो आणि आपल्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना करून दिला. त्यामुळे आज अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत. या विद्यार्थ्यांचा उपयोग गावासाठी करून घ्यायला हवा, असे उद्गार सेवानिवृत्त शिक्षक अशोक धनावडे यांनी सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात काढले.
तालुक्यातील निर्व्हाळ पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा नं. १ येथे माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत व शालेय शिक्षण समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला चिपळूणचे माजी नगरसेवक शशिकांत मोदी, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शिंदे, सरपंच मधुकर सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष दत्ताराम सावंत, मुख्याध्यापक श्री. तांबीटकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. वाघे, बंडूतात्या भागवत, सर्व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. धनावडे म्हणाले की, आपण विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी छडी दिली असेल. मात्र, ही छडी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी होती, असे मनोगत व्यक्त करताना ते भावनाविवश झाले.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक शशिकांत मोदी म्हणाले, हा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला हे धनावडे गुरुजी यांचे भाग्य आहे. सर्व व्यवस्था माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. आज इतक्या मोठ्या प्रमाणात पूर्ण गाव एकत्र येऊन एखाद्या शिक्षकाचा सेवानिवृत्ती सोहळा अशा पद्धतीने साजरा होत असेल हे भाग्य एखाद्यालाच मिळू शकते, अशा भावना श्री. मोदी यांनी व्यक्त केल्या. शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शिंदे यांनीदेखील धनावडे गुरुजी यांच्या कार्याची दखल घेत त्यांनी केलेले आजवरचे शैक्षणिक काम अधोरेखित केले. शिवाय जरी शासनाचा पुरस्कार मिळाला नसला तरी आजचा हा सत्कार म्हणजेच पुरस्कार आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शिंदे यांच्या हस्ते अशोक धनावडे यांचा गौरव करण्यात आला तर माजी विद्यार्थी यांनी मानपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव केला. याशिवाय विविध ग्रामविकास मंडळांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे गुरुजींचा यावेळी सन्मान केला. सूत्रसंचालन शैलेश सावंत यांनी केले तर माजी विद्यार्थी संकेत सावंत व ग्रामस्थ ज्ञानेश्वर सावंत यांनी सांगितिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उद्योजक गणेश चव्हाण, मोहन सावंत, सुभाष सावंत, नीलेश सावंत आणि आजी-माजी विद्याथ्यांनी मेहनत घेतली.
चौकट-
गुरुजी रिटायर होताना…
एका शाळेत तब्बल २८ वर्षे शिक्षक म्हणून कार्य करणारे गुरुजी रिटायर होणार अर्थात उद्यापासून शाळेत नसणार याची विद्यार्थ्यांना कल्पना येताच शाळेतील सर्वच विद्यार्थी रडू लागले. एकीकडे गुरुजींचे सत्कार होत असताना दुसरीकडे विद्यार्थी मात्र ढसाढसा रडत होते, असा अनुभव या कार्यक्रमात आला. अत्यंत हृद्य असा हा सत्कार सोहळा झाला.
चौकट-
संमिश्र भावनांचा समारंभ
सेवानिवृत्ती ही प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या जीवनातील अपरिहार्य बाब असते. मात्र अनुभवी कर्मचारी सेवानिवृत्ती झाल्याने त्या शाळेच्या कामकाजात अशा कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवते. यामुळे अनुभवसंपन्न कर्मचारी सेवानिवृत्त होणे ही एक प्रकारे त्या शाळेची हानी असून ही हानी भरून निघायला काही कालावधी जातो. चांगले कार्यक्षम अधिकारी आज सेवानिवृत्त होत असून हा संमिश्र भावनांचा समारंभ असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कीर यांनी व्यक्त केले.












