एमआयडीसीच्या राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धांना प्रारंभ

रत्नागिरी : प्रतिनिधी 
कोण कुठला ताम्रपट घेऊन आलेला आहे माहीत नाही, उदय सामंत आज मंत्री आहेत उद्या नसतील, परंतु डॉ. विपिन शर्मा एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आजही आहेत उद्याही असतील असे प्रतिपादन सिंधुरत्नचे निमंत्रित सदस्य किरण सामंत यांनी केले. एमआयडीसीने राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धांप्रमाणेच अन्य स्पर्धाही आयोजित कराव्यात असे सांगतानाच मीही खेळाडूंप्रमाणे आता प्रतिज्ञा केली आहे की, उद्यापासून धावायला सुरुवात करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धांना रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरुवात झाली. यावेळी किरण सामंत बोलत होते. ते म्हणाले की 2018 पयर्र्त मी आणि उद्योगमंत्री रोज अर्धा-पाऊण तास व्यायाम करायचो, ज्या दिवशी उदय सामंत यांनी व्यायाम करायचा सोडला त्यावेळी मीही सोडला. त्यानंतर आज खेळाडूंनी शपथ घेतली, ती शपथ घेत असताना मीही मनोमन शपथ घेतली की उद्यापासून अर्धा तास धावायचे ठरवले आहे. शुटींग बॉल स्पर्धेंप्रमाणेच अन्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावेत. ज्यामुळे तीन दिवसांच्या कार्यक्रमातून उर्वरीत वर्षासाठी ऊर्जा मिळते, त्यामुळे अन्य स्पर्धा व कार्यक्रमांचा विचार व्हावा असे आवाहनही सिंधुरत्नचे सदस्य सामंत यांनी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना केले. शासकीय स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र आता चांगले ढवळू लागले आहे.

या कार्यक्रमावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, महाव्यवस्थापक मनुष्यबळ तुषार मटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्रकुमार काकोस्ते, सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांच्यासह राज्यात विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर राज्यभरामधून एमआयडीसीचे हजारो कर्मचारी राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धेसाठी दाखल झाले आहेत. या सर्वच खेळाडूंचे रत्नागिरी एमआयडीसीच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले.