समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘ग्रंथालय’ योगदान महत्वाचे!

माजी जिप उपाध्यक्ष रणजित देसाई : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन मालवण येथे संपन्न

अमित खोत | मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतकोत्तर वर्षे असलेली अनेक ग्रंथालय आहेत. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्रंथालय चळवळीची योगदान महत्वाचे आहे. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांसदर्भात माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित मंत्री आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ल्ह्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसदर्भत आणि आवश्यक असणाऱ्या अनुदानासंदर्भात मागणी पाठपुरावा करण्यात येईल. असे आश्वासन जिल्हापरिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी मालवण येथे बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन मालवण मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी रविवारी संपन्न झाले. या अधिवेशन सोहळ्याचे उदघाटन रणजित देसाई यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष धाकु तानवडे, रूजारिओ पिंन्टो, कार्यवाह राजन पांचाळ, सहकार्यवाह महेश बोवलेकर, विठ्ठल कदम, उदयराव मोरे, नागेश कदम, सौ. मेधा शेवडे, सौ. वैदेही जुवाटकर, नागेश कदम, प्रकाश कुशे, शैलेश खांडेळकर, भरत गावडे, नाथा मडवळ, सतीश गावडे, ऋतुजा केळकर, मानसी दुधवडकर, अरविंद म्हापणकर, गजानन वालावलकर, प्रकाश कुशे, उदयराव मोरे, सुरेंद्र सकपाळ, प्रमोद ओरसकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक राजन पांचाळ यांनी तर सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या आदर्श ग्रंथालय पुरस्कार माळगाव ग्रंथालय व वाडा ग्रंथालय यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 1 आदर्श कार्यकर्ता पुरस्कार त्रिंबक वाचनालयाचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांना, करूळ ग्रंथालयाचे सचिव लक्ष्मण नारकर यांना, आदर्श सेवक पुरस्कार कणकवली वाचनालयाचे राजन ठाकूर यांना व मुणगे भगवती वाचनालयाचे विश्वास मुणगेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

ग्रंथालय चळवळीतील संस्था आणि त्यातील कर्मचारी हे अनेक अडचणींतून आपल्या संस्थांचे काम पाहत आहेत. याहिपुढील काळात अनेक अडचणींतून ग थालय चळवळ पुढे नेणे गरजेचे आहे. यासाठी वाचक टिकला पाहिजे तरच आपण टिकणार आहोत. शासन यंत्रणांनी आजपर्यंत फक्त आश्वासने दिली आहेत. कामगारांना किमानवेतन नुसार मानधन मिळाले पाहिजे यासाठी आता आमचा लढा सुरू आहे. आजपर्यंत अनेकांनी फक्त साथ केली मात्र निर्णय होण्यासाठी लढाच द्यावा लागला आहे. आताही आम्ही माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी तयार आहोत, त्यांनी आमच्या समस्यांसाठी शासन स्तरावर प्रयत्न करावेत, असे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके म्हणाले.

शासनाकडून ग्रंथालय कायद्यात दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. यासाठी एक समितीही गठीत करण्यात आलेली आहे. येत्या काळात ग्रंथालय चळवळ अधिक सक्षमपणे कार्यरत होण्यासाठी शासन स्तरावर निर्णय होण्याची शक्यता आहे. आता शासन निधी थेटपणे ग्रंथालयांना मिळत आहे. याही पुढील काळात ग्रंथालयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले.

दुपारच्या सत्रात जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या उपस्थितीत खुले अधिवेशन झाले. त्यानंतर कवी संमेलन आणि शेवटी ग्रंथालय कर्मचारी यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.