रत्नागिरी : फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरीच्या द इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप आणि डेव्हलपमेंट सेल (आयईडीसी) व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) आणि जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॉर्नेल महा – ६०’ ह्या व्यवसाय गतिमान जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
‘कॉर्नेल महा – ६०’ हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. ज्याचा उद्देश नवीन उद्योजकांना प्रशिक्षण देणे हा आहे. महाराष्ट्र सरकारने उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क आणि एक्स इ डी (कॉर्नेल विद्यापीठाचे भारतीय भागीदार) यांच्याशी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. ‘कॉर्नेल महा – ६०’ या कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या उद्योजकीय यशाला चालना देणाऱ्या पुढच्या पिढीचे पालनपोषण करण्यासाठी ६० तेजस्वी उद्योजकांना एकत्र आणले आहे. यामध्ये सहभाग घेणाऱ्यांना शिक्षण अध्यापनशास्त्र आणि प्रोग्राम स्ट्रक्चरद्वारे व्यवसाय, नेतृत्व, नवीन उपक्रम, डिजिटल विपणन, वित्त सारख्या अनेक क्षेत्रातील ज्ञान मिळते.
मुख्य कार्यक्रमाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये कॉर्नेल विद्यापीठाचे प्रमाणपत्र, कॉर्नेल विद्याशाखेतील प्राध्यापक व उद्योग तज्ञांकडून मार्गदर्शन, २० लाख रुपयाचे फायदे, भांडवल उभारणीच्या संधींमध्ये प्रवेश, विनामूल्य सहकारी जागा, भविष्यातील यश आणि भागीदारी चालवण्यासाठी सहकारी नवकल्पकांसह नेटवर्किंग, कॉर्नेलकडून १७०० पेक्षा जास्त निवडकांसाठी वर्षभर प्रवेश याचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे मान्यवर श्री. प्रकाश हंबर ( व्यवस्थापक, डीआयसी रत्नागिरी ), श्री. अशोक जॉन, ( कार्यकारी संचालक, एक्सईडी ), श्री संदेश कांबळे ( व्यवस्थापक एक्सईडी ), श्री.निनाद बेहरे ( संचालक, ध्रुव एंटरप्रायझेस, रत्नागिरी ) यांना फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला फिनोलेक्स ॲकॅडमीचे डीन आर अँड डी डॉ. संदीप चावडा व फिनोलेक्स ॲकॅडमीचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. किशोर भोसले हे उपस्थित होते. फिनोलेक्स ॲकॅडमीमधील १६० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ.कौशल प्रसाद व प्रा.किशोर भोसले यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. डॉ. संदीप चावडा यांनी फिनोलेक्स ॲकॅडमीमधील आयईडीसी आणि आयआयसीच्या कार्यप्रणालीबद्दल माहिती दिली आणि कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला. फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी उद्योजकता आणि सध्याच्या परिस्थितीत त्याची प्रासंगिकता यावर आपले विचार व्यक्त केले. श्री. प्रकाश हंबर यांनी अशा कार्यक्रमांची आवश्यकता विषद करताना पदवी स्तरावरील जागरूकता कशी फायदेशीर आहे यावर प्रकाश टाकला आणि उद्योजकांसाठी डीआयसीच्या पाठिंब्याबद्दल चर्चा केली. श्री. अशोक जॉन आणि श्री. संदेश कांबळे यांनी कॉर्नेल महा – ६० कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. श्री.निनाद बेहरे यांनी त्यांचा उद्योजकीय प्रवास, त्यांना आलेली आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठीची रणनीती याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना श्री. अशोक जॉन आणि श्री.निनाद बेहरे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कॉर्नेल महा – ६० कार्यक्रमाची जनजागृती प्रभावीपणे करत डॉ. संदीप चावडा यांच्या आभारप्रदर्शनाने सत्राची सांगता झाली.










