पाणी पिताना प्लास्टिक बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची प्राणीप्रेमींकडून सुटका

 

माजी जि.प. सभापती मंगेश तळवणेकर यांचे प्रयत्न

सावंतवाडी । प्रतिनिधी : पाणी पिण्यासाठी एका भटक्या कुत्र्याने प्लास्टीक बरणीत तोंड घातले खरे मात्र त्याचे तोंड प्लास्टीक बरणीत घट्ट अडकून बसले. तशाच स्थितीत गेले चार दिवस कुत्रा तसाच पळत होता.

अखेर प्राणी मित्र नरेंद्र सावंत यांनी त्याला मुक्त करीत जिवदान दिले.

कुत्र्याचे तोंड बरणीत अडकल्याचा हा प्रकार सावंतवाडी शहरात चार दिवसांपूर्वी घडला होता. सदरची बरणी काढण्यासाठी सबनीसवाडा येथील प्राणी प्रेमींचे प्रयत्न सुरु होते. परंतु यश मिळत नव्हते.

त्यानंतर सदरची बाब माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर यांना समजताच त्यांनी तातडीने प्राणी प्रेमी नरेंद्र सावंत यांना घेवून सबनीसवाडा येथे धाव घेतली. सदर ठिकाणी निशांत तोरसकर, शैलेश नाईक, अरुण घाडी यांच्या मदतीने सदरची बरणी काढण्यासाठी प्रयत्न करत असता सदरचा कुत्रा भयंकर चिडला होता.

अखेर नरु उर्फ नरेंद्र सावंत यांनी मोठ्या धिरोदत्तपणे व शिताफीने कुत्र्याला पकडून त्याच्या तोंडावरील बरणी काढून कुत्र्याला जीवदान दिले.

सध्या उन्हाळा वाढत असल्याने भटक्या कुत्र्यांना तसेच अन्य प्राण्यांना तहान लागल्याने ते पाण्याच्या शोधार्थ भटकत असतात. यासाठी आपल्या घराबाहेर पाण्याचे भांडे पाणी भरुन व दोन घास आपल्या जेवणातले प्रत्येकाने या मुक्या प्राण्यांसाठी ठेवून त्यांचा जीव वाचवावा असे आवाहन मंगेश तळवणेकर यांनी केले आहे.