वेळगिवे गावठण येथील घटना ; सुमारे ८५ हजार रुपयांचे नुकसान
देवगड : प्रतिनिधी
वेळगिवे गावठण येथील नीलेश लाड यांच्या गोठ्याला आज दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास आग लागून गोठा आगीत जळून खाक झाला आहे. या दुर्घटनेमध्ये सुमारे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नीलेश लाड यांनी रोजच्या प्रमाणे आपली गुरू सकाळी चरवण्यासाठी सोडली होती. त्यामुळे गोठा रिकामी होता. मात्र दुपारी अचानक या गोठ्यातून धूर येऊ लागल्याने पाहिले असता आग लागल्याचे दिसून आले. तत्काळ ती आग विझवण्यासाठी लाड व ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले.ग्रामस्थांच्या सहकार्याने ही आग सायंकाळी विझविण्यात आली. ग्रामसेवक यु.एस. मुलानी, सरपंच राजन लाड, उपसरपंच सदैव लाड, माजी सरपंच संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर तलाठी सौ मिस्त्री मॅडम यांच्याकडून पंचनामा करण्यात आला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.













