आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाची कास धरून मुलांनी प्रगती साधावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

सावंतवाडीची सुधारित नळ योजना व माजगाव धरणाचेही ऑनलाईन भूमिपूजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : आधुनिक भारत घडविण्यासाठी विज्ञान हे अत्यंत गरजेचे आहे. जगभरातील अनेक देशांप्रमाणेच भारत देशही आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञानाचे महत्त्व ओळखून संशोधनाला संधी दिली आहे. त्यातूनच आज आपला देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश ठरला. विज्ञान क्षेत्रात अनेक विविध प्रयोग आपला देश करीत आहे. यातूनच प्रेरणा घेऊन मुलांनी विज्ञानाची कास धरून आपली व पर्यायाने देशाची प्रगती साधावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सावंतवाडी जिमखाना येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन पद्धतीने केले. त्यानंतर शुभेच्छा देताना त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर, शिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकरी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी न.प.चे मुख्याधिकारी सागर साळुंखे, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, ॲड. निता सावंत, बाबु कुडतरकर, आर्किटेक्ट अमित कामत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, म.ल.देसाई, गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काकतकर, नितीन सांडये, माजगांव सरपंच डॉ.अर्चना सावंत, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, आबा केसरकर, प्रसन्ना शिरोडकर आदी उपस्थित होते.

भारत देश व महाराष्ट्र राज्यही विज्ञानाच्या दृष्टीने प्रगतीपथावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेले विद्यार्थी नव्या आधुनिक भारताचे भविष्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विज्ञान व संशोधनाला पंख देण्याच काम केलं आहे. विज्ञान क्षेत्रात देशाने मोठं योगदान दिलं आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधांना महत्व देणार आमचं सरकार आहे. यात शिक्षणाला अधिक प्राधान्य दिलं आहे‌.

विविध उपक्रमातून मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
आज राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन सावंतवाडीत होत आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षण विभागाच यासाठी करावं तेवढं कौतुक थोड आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर नाविन्यपूर्ण संकल्पना शिक्षण विभागात राबवीत आहेत‌. शासकीय शाळा खाजगी शाळेंच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मराठी भाषा संवर्धनासाठी ते कार्यरत आहेत. आपली संस्कृती व परंपरा टिकविण्यासाठी मराठी भाषेतून शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.शैक्षणिक क्षेत्रात अनेक अमुलाग्र बदल करण्याचे काम आपले सरकार करीत आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांना पुढे जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कौशल्य विकासाला गती देण्याच काम आम्ही करत आहोत. आज नळपाणी योजनेचा व धरणाचा शुभारंभही आज झाला आहे. यामुळे पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे‌. पावसाचं पाणी अडवून पाणी वाचविण्यासाठी असे प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकरी वर्गाला यांचा फायदा होईल तसेच स्वच्छ व सुंदर शहरांसाठी मोहीम आम्ही हाती घेतली आहे‌. विकासाला गती देण्याच काम महायुती सरकार करत आहे. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. राज्याचा सर्वांगीण विकास बोलून नाही तर तो आम्ही करुन दाखवत आहोत. हे सरकार गतिमान सरकार आहे. धाडसी निर्णय घेणार सरकार आहे, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.