आंबये येथे लागलेला वणवा विझविण्यात जवानांना यश

खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील आंबये येथे  शुक्रवारी लागलेल्या वणव्याने  उन्हामध्ये घेतलेल्या रौद्र रुपामुळे वणवा ग्रामस्थांच्या घराजवळ पोहोचला. खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन जवानांनी वेळेत पोहोचून घराजवळ आलेला वणवा विझविल्यामुळे कोणतीही जिवीत आणि वित्तहानी झाली नाही.
आंबये येथील भैरी कोटेश्वरी मंदिरा जवळ असणाऱ्या मोकळ्या माळरानावर सुकलेल्या गवताला सकाळी ११ च्या सुमारास वणवा लागला. दुपारच्या कडक उन्हामुळे वणव्याने रौद्र रूप धारण केले होते. वणवा रस्त्याच्या जवळ असणाऱ्या दोन घरांजवळ येत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्राला कळविले. ही माहिती मिळताच खेड अग्निशमन केंद्राचे फायरमन शाम देवळेकर, जयेश पवार, प्रणय घाग, दीपक देवळेकर, वाहन चालक विद्याधन पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पोहोचून वणवा विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सायंकाळी ४:३० वाजता आग विझविण्यात अग्निशमन जवानांना यश आले. या आगीतून ग्रामस्थांची घरे व इतर साहित्य वाचविण्यात यश आले असून कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.