हातदे गावचे माजी सरपंच यशवंत चव्हाण यांचे निधन

 

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील हातदे गावचे सुपुत्र, माजी सरपंच, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यशवंत महादेव चव्हाण यांचे दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी विरार मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

यशवंत चव्हाण हे प्राथमिक शिक्षक होते. आपल्या ३५ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ते शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी गावच्या विकास कामात लक्ष केंद्रित केले. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कामाची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केली. सरपंच पदी असताना त्यांनी गावात विकासाचा झंझावात निर्माण करून विकासाची अनेक कामे मार्गी लावली. गावच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कामात ते स क्रिय असायचे. हातदे ग्रामसेवा संघ मुंबई आणि हातदे महाशिवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी व सल्लागार म्हणून अनेक वर्षे काम केले. काही महिने प्रकृतीच्या कारणास्तव ते मुंबईला होते. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. यशवंत चव्हाण यांच्या निधनाने हातदेवासियांचे कधीही भरुन न निघणारे अपरिमीत नुकसान झाल्याचे प्रतिक्रिया हातदे ग्रामसेवा संघ मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त करून त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.