‘वीर खून प्रकरणा’तील संशयित दर्शन पाटील याचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बहुचर्चित सीताराम वीर खून प्रकरणातील संशयित आरोपी दर्शन शांताराम पाटील (५७) याचा उपचारादरम्यान मुंबईतील जे.जे. रुग्णालयात मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. प्रकृती ठीक नसल्याने त्याला अवघ्या काही दिवसांपूर्वीच, २३ सप्टेंबर रोजी, अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

मृत सीताराम वीर यांच्या खुनाप्रकरणी दर्शन पाटील याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३०२ (खून), २०१, १०९ सह ३४ भा.दं.सं. नुसार गुन्हा दाखल होता. त्याने आपल्या मुलाला खून करण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप होता.
पोलिसांच्या अटकेनंतर दर्शन पाटील याची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्याला सुरुवातीला रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला उपचारांसाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. वैद्यकीय अहवालानुसार, तो ‘मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम’ ने ग्रस्त होता आणि त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते.

दर्शन पाटील यांच्या वकिलांनी त्यांच्या गंभीर आजारपणाची कागदपत्रे न्यायालयात सादर करत जामिनाची मागणी केली होती. कागदपत्रांचा अभ्यास करून न्यायालयाने दर्शन पाटील हा गंभीर आजारी असल्याचे मान्य केले. त्यानुसार न्यायालयाने त्याला वैयक्तिक ५० हजार रुपयांच्या जामिनावर आणि तितक्याच रकमेच्या हमीवर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. मात्र जामीन मिळाल्यानंतर काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला.