रानगव्याच्या हल्ल्यात ॲम्ब्युलन्स चालक जखमी

आंबोली फणसवाडी येथील घटना ; अधिक उपचारासाठी आजरा येथे पाठवले 

आंबोली । प्रतिनिधी : गोवा येथे आरोग्य विभागामध्ये १०८ ॲम्बुलन्सवर कार्यरत असलेला चालक स्वप्निल शामराव कांबळे (२९) हा भुदरगड येथून गोवा येथे जात असताना आंबोली फणसवाडी येथे सकाळी सहा वाजताच्या सुमारास गव्याचा कळप अचानक आडवा आल्याने अपघात झाला व यामध्ये स्वप्निल हा किरकोळ जखमी झाला. दोन गवे रस्त्याच्या पलीकडे गेल्यानंतर स्वप्नील याने आपली गाडी पुढे नेली असता तिसरा गवा अचानक गाडीच्या समोर आला व गव्याचे शिंग गाडीच्या पुढील चाकामध्ये अडकले.यावेळी हा गवा गाडी तशीच फरपटत झाडीत घेऊन गेला. सुदैवाने स्वप्निल याच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली नाही.

याबाबतची माहिती स्थानिकांना मिळतात स्थानिकांनी तात्काळ स्वप्नील याला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल केले. लागलीच वनविभागाचे कर्मचारी व वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी घटनास्थळी जात पाहणी केली व अधिक उपचारासाठी स्वप्निल याला आजरा येथे पाठविण्यात आले.