संतोष वायंगणकर
गुहागरचे शिवसेना ठाकरे गटाचे आ.भास्कर जाधव यांनी मातोश्रीवरील बेगडी निष्ठा सिद्ध करण्यासाठी केंद्रियमंत्री ना. नारायण राणे आणि राणे परिवार यांच्यावर पातळी सोडून केलेली टीका पूर्णपणे अयोग्य आणि चूकीचीच होती. आ.भास्कर जाधव यांनी जी बेताल आणि बाष्कळ बडबड केली, जी राजकीय आणि वैयक्तिक टिका केली त्या टिकेनंतर समोरून कोणीच काही बोलायच नाही. ..आपण काहीही बोलणार असं आजच्या समाजकरणातही घडत नाही. राजकारणात तर मुळीच तसं घडण्याची शक्यता नाही.
आ.भास्कर जाधव यांनी जे बोल बोलले त्याचा त्याच शब्दांमध्ये माजी खा. निलेश राणे यांनी समाचार घेतला. यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी आ.भास्कर जाधव यांचा गुहागर मतदार संघच निवडला. गुहागरमधील श्रृंगारतळी येथे जाहीर सभा घेऊन जे सुनवायच होतं, बोलायच होतं ते सारं माजी खा.निलेश राणे यांनी केले. आ.भास्कर जाधव यांनी स्वत:ची राजकीय पोच, पोत याचा कधीच विचार केला नाही. खरंतर केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे यांनी आ.भास्कर जाधव यांच्यावर वैयक्तिक किंवा राजकीय टिका पूर्वी कधीच केली नाही. परंतु यापूर्वीही अधून-मधून आ.भास्कर जाधव ना. नारायण राणे यांच्यावर टिका करतच राहिले. यापूर्वी माजी खा.निलेश राणे यांनीही आ.भास्कर जाधव यांनी राणे परिवारावर शिंतोडे उडवू नयेत असे पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलेले होते. मात्र, याच महिन्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले होते. कणकवलीत सभा घेतली. या सभेत आ.भास्कर जाधव यांनी जे भाषण केलं ते भाषण म्हणजे असभ्य भाषणाचा कळस होता. ज्या आ.भास्कर जाधव यांनी जी जहरी टिका केंद्रिय मंत्री ना.नारायण राणे यांच्यावर केली तत्पूर्वी सहज म्हणून स्वत:च्याच मनाला जरी प्रश्न केला असता तरी आ.भास्कर जाधव यांनाच त्यांच्याच एका मनाने निश्चित सांगितले असते…. आ.भास्कर जाधव तुम्ही पातळी सोडून बोललात! एवढं सगळ बोलल्यानंतर मग त्याची रिअॅक्शन येणारच. यामुळेच माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागरला जाऊन आ.भास्कर जाधव यांच्यावर टिकास्त्र सोडल.* आ.भास्कर जाधव यांनीच शुक्रवार दि. १६ फेब्रुवारीला चिपळूणमध्ये जाणीवपूर्वक कोणतेही कारण नसताना महाविकास आघाडीची बैठक असल्याचे खोट सांगून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिकडे फिरकले नाहीत. हे असले उद्योग करण्यासाठी आम्ही कशाला जाणार अशी चर्चा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यात होत आहे. आ.भास्कर जाधव यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या चिपळूण येथील उबाठाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना जमविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेने प्रसंगावधान राखत योग्य भुमिका घेतली. आ.भास्कर जाधव, खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांना राणेंवर टिका केल्याशिवाय यांच राजकारणच चालत नाही. कोकणातील विकासकामांसंबंधी बोलण्यासारख आ.भास्कर जाधव, विनायक राऊत यांच्याकडे काहीच नाही. यामुळे लक्ष वेधण्यासाठी फक्त ना.नारायण राणे यांच्यावर टिकास्त्र हे एकमेव काम खा.विनायक राऊत, आ.भास्कर जाधव करत आहेत. याच कारण विकासकामांवर बोलण्यासारख किंवा सांगण्यासारख काहीच नसल्याने राणेंवर टिका हा एकमेव काम ते करत आले आहेत. आ.भास्कर जाधव यांनी सभ्यतेची पातळी ओलांडल्यानंतर मग समोरून कोणी काहीच बोलू नये अशी अपेक्षा ठेवली जात असेल तर ते फारच चूकीचे आहे. यासाठीच आ.भास्कर जाधव यांनी केलेली टिका त्यासाठी राणे परिवारासंबंधी वापरलेली भाषा हे एकदा जरूर ऐकावी मग कोणालाही सहज लक्षात येईल की माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागर शृंगारतळीच्या जाहीर सभेत जी टिका केली ती किती योग्य होती.
पण एक मुलगा या नात्याने भास्कर जाधव यांना त्यांच्याच भाषेतून उत्तर देतानाही निलेश राणे यांनी तारतम्य पाळले हे जास्त महत्वाचे. सभेत त्यांचं भाषण सुरु होतं असतानाच त्यांनी आपण कोणत्या भाषेत भास्कर जाधव यांना उत्तर देणारं आहे याची संपूर्ण कल्पना उपस्थितांना दिली होती तर भाषण संपताना त्यांनी व्यासपीठाचे, मैदानाचे गुहागरातील महत्व, नातू कुटुंबाचे योगदान याचा उल्लेख करताना वापरलेल्या भाषेबद्दल माजी आ. विनय नातू यांना उद्देशून व्यक्त केलेली दिलगिरी ही निलेश राणे यांच्यातील संवेदनशील आणि एका जबाबदार नेत्यांची ओळख देतो.
सभ्यता तुम्ही सोडलात पातळी सोडून बोलल्यावर मग असं घडणारच ! बर ज्या केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे यांच्यावर टिका करता त्यांच कोकणच्या विकासकामातील योगदान, राजकीय, सामाजिक काम कुठे ? आणि आपण कुठे याच मोजमाप आ.भास्कर जाधव यांनी स्वत:च मोजावं म्हणजे त्यांच त्यांनाच समजून येईल. आपण कुठे आहोत आणि सर्वच पातळीवर किती छोटे आहेत हे देखिल समजून येईल. आ.भास्करशेठ कोणालाही सुखावण्यासाठी कुणालाही पातळी सोडून दुखावणे चांगल नाही. हे बोलणं, हे वागणं बरं नाही.











