पॅड यात्रा ही मासिक पाळीसाठी मुलींची नवीन शाळा

आय एस एस कंपनीच्या मदतीने कोकण संस्थेचा पुढाकार 

जनजागृती करून गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मासिक पाळीची योग्य काळजी न घेतल्याने आजारी पडून अनेक महिलांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील किशोरवयीन महिलांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की मासिक पाळीबद्दल आवश्यक असलेली माहिती महिला आणि मुलींपर्यंत पोहोचत नसल्यानेच त्यांच्या समस्या वाढत आहेत. यामुळे मासिक पाळीवरील मौन तोडण्यासाठी कोकण एनजीओ आणि आय एस एस या कंपनीच्या वतीने पॅडयात्रा हा उपक्रम सुरु केला असून मासिक पाळीबद्दल जनजागृती करून त्यासंबंधीचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

महिला सक्षमीकरणाला चालना द्यायची असेल तर मासिक पाळीमुळे महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधावे लागतील. यासाठी कोकण स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे ‘पॅडयात्रा ‘ कार्यक्रमांतर्गत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. मासिक पाळीमुळे अनेक महिलांचे मानसिक संतुलन बिघडत असून ते राखण्यात आणि किशोरवयीन मुलींना आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक करून सॅनिटरी पॅड वापरण्यास मदत होते. या कार्यक्रमांतर्गत कोकण एनजीओ द्वारे यावर्षी १६२५ हून अधिक पॅडचे वितरण करण्यात आले.

आता स्त्री आणि पुरुष दोघांनीही मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. आपण पॅडमॅनसारखे चित्रपट बघतो आणि थोडा वेळ विचार करतो की आपण काहीतरी करायला हवे, पण सत्य हे आहे की आजही मासिक पाळीबद्दल जनजागृती करून त्यासंबंधीचे गैरसमज दूर करण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ठाणे आणि पालघर सारख्या आदिवासी बहुल भागातील ९ शाळांमधील १६२५ किशोरवयीन मुलींसाठी जागृती कार्यक्रम घेण्यात आला.

सलिना बुटेलो, श्वेता चोरगे, तारा सांगळे, नाव्या पाटील, नूतन कदम, प्रीती पांगे या सर्वांनी शाळेतील मुलींना वैयक्तिक स्वच्छता, लैंगिक शिक्षण तसेच पोषण आहाराबाबत सविस्तर माहिती दिली.

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत आयोजन करताना, विशेषत: मासिक पाळीच्या काळात संसर्ग कसा टाळावा आणि शरीरात होणारे बदल याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या वयात कोणते बदल घडतात आणि त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, याविषयी माहिती देण्यात आली, जेणेकरून ते समस्या सहज समजू शकतील आणि त्यांचे निराकरण करण्यात त्यांना मदत होईल.

किशोरवयीन मुलींना त्यांच्या वयानुसार वेळेवर माहिती मिळाल्यास त्यांच्या समस्या टाळता येतील. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, योनीतून रक्तस्त्राव होणे हे नैसर्गिक आहे, मासिक पाळीची गरज, या काळात येणारे ताणतणाव, मानसिक तणाव इत्यादी आणि अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. ज्यातून त्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला कि मासीक पाळी हि समस्या नसून गरज आहे.

किशोरवयीन मुलींना योग्य पोषण, लैंगिक आरोग्य, मानसिक आरोग्य, दुखापत आणि लैंगिक हिंसा आणि किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाचे महत्त्व याबद्दल जागृती करण्यात आली. तसेच ॲनिमिया, स्तनांचे आरोग्य आणि संतुलित आहार यावर समुपदेशन करण्यात आले.

सुरक्षितता व स्वच्छता, मासिक पाळीचे व्यवस्थापन, पॅडचा वापर आणि त्यांची विल्हेवाट याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच या सर्व मुलींना ३ वर्षे वापरता येतील असे रियुजेबल पॅडचे वाटप करण्यात आले यावेळी प्रत्येक शाळेतील एका मुलीला एम.एच.एम ॲम्बेसीडर करण्यात आले. गेल्या काही वर्षांत कोकण संस्थेने १२ हजार हून अधिक महिलांना पॅडचे वाटप केले आहे.