सहा महिन्यांपूर्वी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचा साटवली ग्रामपंचायतीच्या सभेत करण्यात आला होता ठराव मंजूर
लांजा (प्रतिनिधी) अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचा ठराव करूनही कारवाई होत नसल्याने साटवली गावात अवैद्य धंद्यांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. तर आंबा बागांमध्ये कामाला आलेले नेपाळी कामगार वर्ग हा दारू पिण्याकडे वळलेला दिसत आहे. त्यातून भांडणतंटे वाढत असल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी जात असल्याने साटवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये अवैध दारू धंदे तसेच तंबाखू , गुटखा सिगारेट सारख्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा एकमुखी ठराव साटवली ग्रामपंचायतीच्या सभेत सहा महिन्यांपूर्वी करण्यात आला होता.
साटवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारूधंदे तसेच तंबाखू, गुटका यासारख्या पदार्थांची विक्री करणार्यांवर कारवाई करण्याचा ठराव करण्याची मागणी ग्रामस्थ जितेंद्र चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र आंबोळकर, अब्रार बरमारे, फारुख लांबे, झहीर कोंडकरी व अकबर रखांगी या ग्रामस्थांनी केली होती . साटवली गावात सुरु असणाऱ्या गावठी, देशी विदेशी दारू विक्री आणि तंबाखूजन्य पदार्थ यांच्या आहारी गावातील तरुण पिढी जात आहे. त्यामुळे संभाव्य पिढीवर होणार दुष्परिणाम टाळण्यासाठी हा ठराव ग्रामपंचायत सभेत करण्यात आला होता. तसेच सदरचा ठराव हा पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना पाठविणार असल्याचे सरपंच ईरम बरणारे यांनी या ग्रामसभेत ग्रामस्थांना आश्वासन दिले होते.
मात्र ठराव करूनही सरपंच यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे येथील भाजपा पदाधिकारी जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले. कारवाई होत नसल्याने अशा अवैध धंद्यांना जणु उत आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तर स्थानिक सरपंच इरम बरमारे यांच्या आशीर्वादानेच गावामध्ये अवैध धंदे चालू असल्याचा आरोप जितेंद्र चव्हाण आणि प्रसाद तरळ यांनी केला आहे. ठराव करून देखील कोणतेही कारवाई होत नसल्याने संबंधित ठरावा बाबत सह्यांची मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साटवली गावात मोठ्या प्रमाणात आंबा बागा आहेत . या बागांमध्ये कामाला आलेले नेपाळी गुरखे सध्या गावात सुरू असलेल्या दारू धंद्यांकडे वळत आहेत. दारू पिऊन भांडण तंटे वाढत असल्याने आंबा बागायतदार देखील हैराण झाले आहेत.











