‘आत्मा कसा दिसतो? हे पाहण्यासाठी मुलानेआई-बापासह घरातील 4 जणांना ठार मारलं,पण…

केरळ : भूत कसं दिसतं हे आपण आजपर्यंत सिनेमातून पाहिलं, पण एखाद्याच्या मनात हा प्रश्न आला तर त्याचं काय होईल, याचं भयंकर उदाहरण काही वर्षांपूर्वी केरळमध्ये घडलं होतं. आत्मा कसा दिसतो हे पाहण्यासाठी घरातील मुलाने आपल्या आई-वडिल आणि बहिणीसह घरातील 4 जणांची हत्या केली.

धक्कादायक, म्हणजे, हत्या केल्यानंतर त्याला याचा अजिबात पश्चातप नव्हता.

केरळच्या नंथनकोड हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला. 9 एप्रिल 2017 रोजी केरळच्या तिरुवनंतपुरममधल्या नंथनकोड भागातल्या एका घरात चार मृतदेह आढळून आले. तिथे निवृत्त प्राध्यापक ए. राजा थंकम (60), त्यांची पत्नी डॉ. जीन पद्मा (58), मुलगा केडल जीनसन राजा (30), मुलगी कॅरोलीन (26) आणि ललिता नावाच्या एक नातेवाईक (70) हे राहत होते. राजा थंकम यांनी दोन्ही मुलांना डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवलं होतं. मुलगी काही दिवसांपूर्वी शिक्षण संपवून भारतात परत आली होती. मुलगा केडल मात्र तिथे होता. तो स्किझोफ्रेनियाचा रुग्ण बनला होता. आत्मा कसा दिसतो, मेल्यानंतर आत्मा कसं काम करतो, आत्म्याला पाहता येतं का अशा विचित्र प्रश्नांनी त्याच्या मनात घर केलं होतं. तो सतत याचाच अभ्यास करायचा. त्याची अभ्यासातली रुची संपली होती. कसं तरी शिक्षण संपवून तो भारतात परतला.

भारतात आल्यावरही तो कायम त्या प्रश्नांवर संशोधन करत राहायचा. घरच्यांशी फारसा बोलायचा नाही. बाहेर जायचा नाही. दिवसरात्र खोलीत असायचा. कोणालाही खोलीत येऊ द्यायचा नाही. त्याची मानसिक स्थिती मानसोपचार तज्ज्ञांनाही दाखवण्यात आली. तिथे त्यानं तज्ज्ञांनाही तेच प्रश्न विचारले. उपचार घेऊनही त्यांचा त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. कालांतरानं त्याच्या डोक्यातलं हे खूळ निघून जाईल, असा विचार पालकांनी केला.

तो घरात राहून आत्म्याबाबत संशोधन करतच राहिला. एके दिवशी त्यानं विचित्र निर्णय घेतला. एखाद्याला डोळ्यांदेखत मारलं, तर त्याच्या शरीरातून आत्मा कसा बाहेर पडतो हे पाहता येईल, असा त्यानं विचार केला. त्याकरिता त्याने हत्येचा कट आखला. पहिली निवड आईची केली. 6 एप्रिलच्या दिवशी घरात केडल, त्याची आई आणि ललिता हे तिघंच होते. केडल आधी आईच्या खोलीत गेला, तेव्हा आई पलंगावर झोपली होती. केडलनं आईवर तीक्ष्ण हत्यारानं वार करायला सुरुवात केली. तसं न करण्यासाठी आईनं वारंवार विनवणी केली; मात्र तो वार करतच राहिला. खोलीतून आरडाओरडा एकून ललिता तिथे आल्या. समोरचं दृश्य पाहून स्तब्ध झाल्या. त्याही किंचाळल्या. केडलने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं. पुन्हा आईकडे नजर वळवली. तोपर्यंत आईचा मृत्यू झाला होता. त्याला वाटलं मागे वळून पाहताना क्षणार्धात आत्मा निघून गेला असेल. यामुळे त्यानं त्याचा मोर्चा ललिता यांच्याकडे वळवला. त्यांनाही केडलनं त्याच पद्धतीनं मारून टाकलं; पण त्याला आत्मा कुठेच दिसला नाही.

या दोन्ही हत्या केल्यानंतर 3-4 तास तसेच गेले. आत्मा का दिसला नाही, याचा तो विचार करत बसला होता. तेवढ्यात त्याचे वडील राजा थंकम आणि बहीण कॅरोलीन घरी आले. ते पाहून केडलनं आत्मा पाहण्यासाठी वडिलांवर वार केले आणि त्यांना संपवलं. तरीही त्याच्या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यानं त्यानं बहिणीलाही मारून टाकलं. त्यानंतर तीन दिवस तो त्या मृतदेहांसोबत घरीच राहिला. त्याला वाटलं, तीन दिवसांनी आत्मा शरीरातून बाहेर पडेल; मात्र 9 एप्रिलला जेव्हा मृतदेहातून वास येऊ लागला, तेव्हा तो घाबरला. यात आपण अडकले जाऊ अशी भीती त्याला वाटली, म्हणून त्यानं मृतदेहांचे छोटे छोटे तुकडे केले. नंतर संपूर्ण घरात आग लावली आणि स्वतः पळून गेला.

घराला लागलेली आग पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी आले, तेव्हा त्यांना आत माणसाच्या शरीराचे तुकडे जळताना आढळले. घरातलेच लोकं असते, तर अशा प्रकारे त्यांचे तुकडे जळले नसते असा विचार पोलिसांनी केला. तपासणी केली असता त्यांचा मृत्यू जळल्यानं झाला नाही, तर त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना समजलं. घरात कोण कोण राहायचं याबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून एक व्यक्ती गायब असल्याचं पोलिसांना कळलं.

केडलच्या वर्तनाबाबतही पोलिसांना शेजाऱ्यांनी माहिती दिली. त्यामुळे केडलवरच संशयाची सुई जात होती. पोलिसांनी थोड्याच दिवसांत केडलला पकडलं. केडलनंही पोलिसांसमोर सगळं कबूल केलं. विशेष म्हणजे ते सांगतानाही केडलच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्याला अजिबात पश्चात्ताप झाला नव्हता. आत्मा कसा दिसतो ते पाहण्याकरिता ते केल्याचं तो वारंवार सांगत होता. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर केल्यावर न्यायालयानं केडलला तुरुंगात पाठवलं. केरळमध्ये या हत्याकांडाची बरीच चर्चा झाली.