आंतरराष्ट्रीय कुरियर कंपनीचा ceo असल्याचे सांगत अडीच लाख पळवले
रत्नागिरी l प्रतिनिधी :आंतरराष्ट्रीय कूरियर कंपनीचा कार्यकारी असल्याचे भासवून फिर्यादीची अडीच लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही फसवणूक बुधवार 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.40 ते सायंकाळी 5 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत प्रा. डॉ. सुधीर अकोजवार (रा. मारुती मंदिर विश्वनगर, रत्नागिरी ) यांनी शनिवार 24 फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 7 फेब्रुवारी रोजी अज्ञाताने त्यांच्या मोबाईलवर फोन करून मी फेडेक्स या आंतरराष्ट्रीय कूरियर कंपनीचा कार्यकारी बोलत असल्याची बतावणी करत सुधीर अकोजवार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 2 लाख 52 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादवी कायदा कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











