चालक फरार, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीसांकडून शोध सुरू
दापोली (विशेष प्रतिनिधी) –
दापोली तालुक्यातील दापोली–बुरोंडी रोडवरील हॉटेल साधना परिसरात रविवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात रिक्षाला इर्टिगा कारने जोरदार धडक दिली. धडक झाल्यानंतर इर्टिगा कारचा चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून, त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या भीषण धडकेत रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाच्या चेसिसलाही गंभीर धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर रिक्षाचालकाने दापोली पोलीस स्थानकात धाव घेऊन अपघाताची माहिती दिली. घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत असून फरार इर्टिगा कारचालकाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने, घटनेत जीवितहानी टळली असली तरी रिक्षाचालकाचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.










